दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला मोकळं सोडू नका, हिंदुस्थान अमेरिकेला समजावणार

पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसलं असून त्याला अजिबात सूट देऊ नका, असा युक्तिवाद हिंदुस्थानतर्फे परराष्ट्र मंत्री जयशंकर अमेरिकेला करणार आहेत. मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे हिंदुस्थानात दाखल होत असून आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर हे त्यांच्यासोबत बैठक करणार आहेत.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन सध्या अनेक मोर्चांवर आघाडी सांभाळत आहेत. असं असतानाही त्यांनी हिंदुस्थानसोबतचे संबंध दृढ करण्याच्या हेतूने परराष्ट्र मंत्र्यांना हिंदुस्थान भेटीवर धाडलं आहे.

या बैठकीत कोरोना महामारीविरोधात सहकार्य तसंच हिंदी-पॅसिफिक महासागरांमधील रणनितीसंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे अशा मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीतच जयशंकर हे हिंदुस्थानतर्फे पाकिस्तानच्या कारवायांचे पुरावे ब्लिंकन यांच्यासमोर ठेवणार आहेत.

पाकिस्तानच दहशतवादाला पैसा पुरवतो, तसंच सीमेपलिकडील दहशतवादाला खतपाणी घालण्यामागे पाकिस्तानच आहे. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही नरमाई दाखवली जाऊ नये, असं या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य परत घेतल्यानंतर आता अमेरिका पाकिस्तानने त्यांना काही सैन्य तळ उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे. त्या बदल्यात पाकिस्तान आपल्यावरील निर्बंध कमी होण्याची अपेक्षा ठेवून आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीत पाकिस्तानला कुठलीही सूट देऊ नये, अशी मागणी हिंदुस्थानतर्फे करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या