पाकिस्तान हिंदुस्थानवर अणुहल्ला करणार होता, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

mike-pompeo-us

2019 साली पाकिस्तान हिंदुस्थानवर अणुहल्ला करणार होता असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदुस्थानने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान हिंदुस्थानवर अणुहल्ला करणार होता असं पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. पॉम्पिओ यांचे ‘नेव्हर गिव्ह अॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामध्ये पॉम्पिओ यांनी हा दावा केला आहे.

माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटलंय की 27-28 फेब्रुवारी 2019 रोजी ते हनोई इथे आयोजित करण्यात आलेल्या अमेरिका उत्तर कोरिया शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना हिंदुस्थानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान हिंदुस्थानवर अणुहल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. यानंतर आपण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींशी रात्रभर बोलून हा हल्ला रोखला असा दावा पॉम्पिओ यांनी केला आहे.

व्हिएतनाममधल्या हनोईमधली ती रात्र आपण कधीही विसरू शकत नाही असे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अणुहल्ला केला असता तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान तयारी करत होता, आपण तिथल्या वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाच्या नेत्यांशी बोललो आणि त्यांना परिस्थिती सुधारण्यासाठी मला थोडा वेळ द्या, मी पाहातो असं सांगितलं होतं असं पॉम्पिओ यांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता.