हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा पक्का, सौरभ गांगुली यांच्याकडून हिरवा कंदील

टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम असले तरी हिंदुस्थानचा डिसेंबर महिन्यापासून सुरू होणारा ऑस्ट्रेलियन दौरा निश्चित असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडून याप्रसंगी सांगण्यात आले. मात्र या दौऱयाआधी हिंदुस्थानी क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ यांचा क्वारंटाइन कालावधी कमी दिवसांचा असावा अशी मागणी बीसीसीआयकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे ठेवण्यात आली आहे.

सौरभ गांगुली पुढे म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये कोरोना प्रार्दुभाव मोठय़ा प्रमाणात झालेला नाहीए. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट आरामात खेळण्यात येऊ शकते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरात फक्त कोरोनाबाधीत जास्त प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा होईल, असे सौरभ गांगुली यावेळी स्पष्टपणे म्हणाले.

या वर्षी आयपीएल होणारच
– टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरच आयपीएलचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी आयपीएलचे या वर्षीचे भवितव्य अधांतरीत आहे असे म्हटले जाते. पण सौरभ गांगुली यांना आयपीएलच्या आयोजनबाबत ठाम विश्वास आहे. 2020 हे वर्ष आयपीएलशिवाय पूर्ण होणार नाही, असे ते यावेळी न विसरता म्हणाले.

ऑस्ट्रेलियात जिंकावेच लागेल
– दोन वर्षांपूर्वी हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारली होती. पण आता कांगारूंच्या संघात स्टीवन स्मिथ व डेव्हिड कॉर्नर या दोन प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आगामी मालिका खडतरच असेल. किराट कोहलीने संघासमोर आदर्श उभा केलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियात गेल्यावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज द्यावी लागेल असे म्हणून आता चालणार नाही. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात विजयाचा झेंडा रोवावाच लागणार आहे, असा विश्वास सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला.

दोन आठवडे हॉटेल रूममध्ये बसणे निराशाजनकच
– बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलियन दौऱयाला थम्स अप दाखवण्यात आलाय. फक्त खेळाडूंचा क्वारंटाईन कालाकधीत कमी असावा. हॉटेलमधील रूममध्ये 14 दिवस एकांतवासात राहणे कठीणच आहे. त्यामुळे खेळाडूंना निराशा येऊ शकते. मनोबल ढासळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे सौरभ गांगुली यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या