तिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय

52

सामना प्रतिनिधी । वोर्सेस्टर

कार्तिक त्यागी, रवी बिश्नोई, विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांची प्रभावी गोलंदाजी आणि यशस्वी जैसवाल, दिव्यांश सक्सेना व प्रियम गर्ग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने यजमान इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा 5 गडी व 64 चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तिरंगी मालिकेत दमदार सलामी दिली.

इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाकडून मिळालेल्या 205 धावांचा पाठलाग करणार्‍या हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने पाच गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. सलामीवीर यशस्वी जैसवालने 9 चौकारांसह 78 धावा फटकावल्या. दिव्यांस सक्सेनाने 43 धावांची आणि प्रियम गर्गने 38 धावांची खेळी साकारत हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा डाव 204 धावांमध्येच गडगडला. लुईस गोल्डस्वर्थी याने 58 धावा तडकावल्या. हिंदुस्थानच्या युवा संघाकडून कार्तिक त्यागी व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन व विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या