17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार

हिंदुस्थानात या वर्षी महिलांच्या 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार होते. पण कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा पुढल्या वर्षी (2021) फेब्रुवारी – मार्च या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कोरोनामुळे अद्यापही क्रिडाविश्व पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चार महिने बाकी, पात्रता फेरीच्या लढती झालेल्या नाहीत

स्पर्धा आयोजनाची बदललेली तारीख पाहता आता फक्त चारच महिने शिल्लक राहिलेले आहेत. मात्र अजूनही आफ्रिका, उत्तर व मध्य अमेरिका व दक्षिण आफ्रिका खंडातील पात्रता फेरी झालेल्या नाहीत. युरोप खंडातील पात्रता फेरी रद्द केल्या. या खंडातून स्पेन, इंग्लंड, जर्मनी या अव्वल संघांना प्रवेश देण्यात आलाय. ओशिनिया गटातून न्यूझीलंडचे नाव पुढे करण्यात आलेले आहे. आशिया खंडातील पात्रता फेरी व्यवस्थित पूर्ण झाल्या. येथून जपान व उत्तर कोरिया हे दोन संघ पुढे आहेत.

… तर हिंदुस्थानचा कॅम्पही लागणार नाही

हिंदुस्थानच्या युवा महिला संघाचे प्रशिक्षक थॉमस डेनरबाय हे मार्च महिन्यापासून स्वीडनमध्ये आहेत. या संघातील खेळाडूही आपआपल्या घरीच आहेत. या खेळाडूंच्या सराव शिबिरासाठी अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास या कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या