Brisbane Test ऐतिहासिक विजयानंतर BCCI कडून टीम इंडियासाठी मोठी घोषणा, 5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट रोमहर्षक ठरला. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरस पाहायला मिळाली. अर्थात पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वर्चस्व दिसत होते. हिंदुस्थानने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकत गावसकर-बॉर्डर करंडकावर आपले नाव कोरले आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचा आनंद गगनात मावेना अशी स्थिती आहे. या विजयानंतर अवघ्या काही क्षणातच बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी टीम इंडियाला पाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

ट्विटरवरून जय शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘हिंदुस्थानच्या क्रिकेटसाठी हा अत्यंत खास क्षण आहे. टीम इंडियाने उत्तम चारित्र्य आणि कौशल्याचे दर्शन करवले आहे.’, असेही जय शहा यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाला त्याच्या अभेद्य किल्ल्यात म्हणजेच ब्रिस्बेनच्या गाबा मैदाना पराभूत करत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. ब्रिस्बेन मध्ये 33 वर्षात ऑस्ट्रेलियाने पराभव पाहिलेला नाही. मात्र टीम इंडियाने या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करत हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने हा विजय मिळल्याने अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या