फिट्टमफाट! राजकोटवर हिंदुस्थानचेच राज्य, वन डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सपाटून मार खाणाऱया हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने राजकोट येथे झालेल्या दुसऱया लढतीत कांगारूंना 36 धावांनी धूळ चारली आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. शिखर धवन (96 धावा), लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली यांची शानदार अर्धशतके आणि जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला नमवले. आता येत्या रविवारी उभय संघांमध्ये तिसरी लढत होणार आहे.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 341 धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियाकडून स्टीवन स्मिथ (98 धावा), मार्नस लॅबुशेन (46 धावा) यांनी झुंज दिली. कुलदीप यादवच्या एका षटकात ऍलेक्स कॅरी (18 धावा) व स्टीवन स्मिथ बाद झाले आणि लढतीला कलाटणी मिळाली.

निर्णायक भागीदारी

विराट कोहली व लोकेश राहुल या जोडीने 78 धावांची निर्णायक भागीदारी करताना हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. ऍडम झाम्पाच्या गोलंदाजीवर मिचेल स्टार्कने विराट कोहलीचा अफलातून झेल घेतला. त्याने सहा चौकारांसह 78 धावा केल्या. त्यानंतर लोकेश राहुलने रवींद्र जाडेजाच्या (20 धावा) साथीने टीम इंडियाला 340 धावसंख्येपर्यंत नेले. लोकेश राहुलने तीन षटकार व सहा चौकारांसह 80 धावा फटकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या