तिसरी कसोटी अनिर्णित, मार्श-हॅन्ड्सकॉम्बने कांगारूंना वाचवले

40
सामना ऑनलाईन । रांची
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली रांची कसोटी अखेर अनिर्णित राहिली आहे. शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पराभवापासून वाचवले आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात ६ बाद २०४ धावा केल्या. मार्श आणि हॅन्ड्सकॉम्बनं केलेल्या शतकी भागीदारीमुळे हिंदुस्थानचे कसोटी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मार्श आणि हॅन्ड्सकॉम्बने १२४ धावांची भागीदारी केली. जाडेजान मार्शला बाद केले तेव्हा कसोटी हिंदुस्थानच्या हातातून गेली होती. मार्श आणि हॅन्ड्सकॉम्ब या दोघांनी अर्धशतक झळकावले. हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजानं सर्वाधिक ४ बळी मिळवले. ईशांत शर्मा आणि आर. अश्विनला प्रत्येकी एक बळी मिळाला.
मार्श-हॅन्ड्सकॉम्बने रडवले
रांची कसोटी जिंकण्याच्या आशेनं उतरलेल्या हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाच्या मार्श आणि हॅन्ड्सकॉम्ब या जोडीने रडवले. स्मिथ आणि रेन्शो बाद झाल्यानंतर हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या मात्र मार्श आणि हॅन्ड्सकॉम्बने केलेल्या १२४ धावांच्या शतकी भागीदारीने या आशांवर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा यशस्वी सामना करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. पीटर हॅन्ड्सकॉम्बने डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहून ७२ धावा केल्या, तर शॉन मार्शने बाद होण्याआधी ५३ धावांची खेळी केली.
ईशांत-जाडेजाने आशा वाढवल्या
रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात ईशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने सलग दोन षटकात दोन बळी मिळवत हिंदुस्थानच्या कसोटी जिंकण्याच्या आशा वाढवल्या होत्या. ईशांत शर्माने रैन्शॉला पायचीत करत आजचा पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर रवींद्र जाडेजाने कर्णधार स्मिथचा त्रिफळा उडवला आणि हिंदुस्थानी खेळाडूंनी एकच जल्लोष केला. झटपट मिळालेल्या या बळींमुळे हिंदुस्थानी संघाच्या कसोटी जिंकण्याच्या आशा वाढल्या होत्या मात्र मार्श आणि हॅन्ड्सकॉम्बने केलेल्या शतकी भागीदारीने या आशांवर पाणी फिरवले.
हुकुमी एक्का ‘फ्लॉप’
हिंदुस्थानी संघाचा हुकुमी एक्का म्हणून ओळखला जाणाऱ्या आर. अश्विनला रांची कसोटीत दोन्ही डावांत बळीसाठी झुंजावे लागले. पहिल्या डावात ३४ षटकांची गोलंदाजी करत त्याने १ बळी मिळवला. दुसऱ्या डावातही हेच चित्र पाहायला मिळाले. दुसऱ्या डावांत अशिवनने ३० षटकांची गोलंदाजी करत ७१ धावा दिल्या आणि १ बळी मिळवला.
चौथी कसोटी ‘रंगणार’ 
पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी हिंदुस्थानने जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती, त्यामुळे रांची कसोटीला महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र रांची कसोटी वाचवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. त्यामुळे मालिका विजयासाठी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील चौथी कसोटी रंगतदार होणार आहे. मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी हिमाचल प्रदेशमधील धरमशाळेच्या मैदानावर होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या