INDW vs AUSW – हिंदुस्थान द्विशतकी आघाडीसमीप, कसोटीवर पकड आणखी घट्ट

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या एकमेव कसोटीत हिंदुस्थानी संघाने पहिल्याच दिवशीच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर आज दुसऱया दिवशी स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्या तडाखेबंद अर्धशतकांनी हिंदुस्थानी डावाला दुसऱया दिवसअखेर द्विशतकी आघाडीसमीप नेत 7 बाद 376 अशी जबरदस्त मजल मारून दिली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन महिला संघाला 219 धावांत गुंडाळणाऱया हिंदुस्थानने आज 5 विकेटच्या मोबदल्यात 278 धावा काढत आपली आघाडी 157 धावांपर्यंत नेली असून एकमेव कसोटीच्या तिसऱयाच दिवशी कसोटीचा निकाल लावण्यासाठी हिंदुस्थानी महिला आर्मी सज्ज झाली आहे.

काल 2 बाद 98 धावांवर असलेल्या हिंदुस्थानी डावाला बळकटी देण्यासाठी सर्वांनीच मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱया स्नेह राणाने केवळ 9 धावा केल्या असल्या तरी तिने स्मृती मानधनाच्या साथीने 50 धावांची भागी रचली. मानधनाला चांगलाच सूर सापडला होता. ती आज हमखास शतक ठोकेल अशाच ढंगात खेळत होती, पण ती धावचीत झाली आणि तिची खेळी 74 वरच थांबली.

दीप्ती-पूजाची कमाल

14 धावांत 4 धक्के बसल्यानंतर गार्डनरने ऑस्ट्रेलियाला कसोटीत आणण्याचा प्रयत्न केला, पण अन्य गोलंदाज आपली करामत दाखवू शकले नाहीत. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारने तब्बल 40 षटके ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करत दिवसभरातील दुसरी शतकी भागी केली. दोघींनी आठव्या विकेटसाठी 102 धावांची झुंजार अभेद्य भागी रचत हिंदुस्थानला 400 धावासमीप नेत कसोटीवरील आपली पकड अधिक मजबूत केली. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दीप्ती 70 तर पूजा 33 धावांवर खेळत होती. हिंदुस्थानची आघाडी दोनशेच्या पलीकडे नेण्याचे या दोघींचेही प्रयत्न असतील. या दोघींच्या भागीमुळे हिंदुस्थान तिसऱयाच दिवशी कसोटीवर आपला शिक्का मारते, की ऑस्ट्रेलियन हिंदुस्थानला झुंजवतात ते उद्या कळेलच.

रिमा-जेमिमाची शतकी भागी

आपल्या पदार्पणाच्या कसोटीत 68 धावांची खणखणीत खेळी करणाऱया जेमिमा रॉड्रिग्जने आजही आपल्या फलंदाजीची कमाल दाखवली. तिने रिचा घोषच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागी रचत हिंदुस्थानच्या डावाला धावांच्या डोंगरावर चढण्याचा रस्ता तयार केला. दोघींनीही आपली अर्धशतके साजरी केली. जेमिमाने आपल्या सलग दुसऱया कसोटीत अर्धशतक ठोकताना 121 चेंडूंत 73 धावांची झुंजार खेळी केली. या भागीमुळे हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाच्या 219 धावांना केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

गार्डनरने हादरवले

जेमिमा-घोषच्या शतकी भागीमुळे हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडी घेण्यास सुरुवात केली, पण ऍशले गार्डनरने 3 बाद 260 वरून हिंदुस्थानची 7 बाद 274 अशी घसरगुंडी उडवली. आधी तिने जेमिमा-घोषची जमलेली जोडी फोडताना घोषचा अप्रतिम झेल टिपला. मग कर्णधार हरमनप्रीत कौरला शून्यावरच बाद करत हिंदुस्थानी डावाला आणखी एक धक्का दिला. पुढच्याच षटकात यास्तिका भाटियाला पायचीत करत खळबळ माजवली. एवढेच नव्हे तर, खेळपट्टीवर पाय रोवून उभा असलेल्या जेमिमालाही बाद करत हिंदुस्थान डावाला अर्ध्या तासात चौथ्या धक्का दिला.