‘शार्दुल’ सुंदर खेळीने टीम इंडियाचा डाव सावरला, तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंना 54 धावांची आघाडी

ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर हिंदुस्थानचे 6 टॉपचे फलंदाज केवळ 186 धावांत तंबूत परतल्याने संघाचा पहिला डाव कोलमडतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या सातव्या जोडीने नरवीर बाजीप्रभूंप्रमाणे शर्थीने खिंड लढवली. यजमान कांगारूंचा तिखट वेगवान मारा अंगावर घेत या जोडीने गॅबावर धावांचा धाबाच उघडला.

या जोडीच्या ‘शार्दुल’ सुंदर खेळीमुळे हिंदुस्थानला चौथ्या कसोटीत पहिल्या डावात सर्व बाद 336 अशी मजल मारता आली. ठापूर-सुंदर जोडीने सातव्या विकेटसाठी 126 धावांची विक्रमी भागीदारी रचत संघाची डुबती नौका किनाऱ्याला लावली. यजमान कांगारूंचे मोठी आघाडी घेण्याचे मनसुबे या तळाच्या फलंदाजांनी पार धुळीस मिळवले. चौथ्या आणि निर्णायक कसोटी लढतीच्या तिसऱया दिवसअखेर यजमान ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात बिनबाद 21 अशी मजल मारत 54 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार अवस्थेत आहे.

गॅबावर शनिवारच्या 2 बाद 62 या धावसंख्येवरून टीम इंडियाने आज आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. पण जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्प या कांगारूंच्या वेगवान गोलंदाजाच्या तिखट माऱयापुढे हिंदुस्थानी स्टार फलंदाज फार काळ टिपू शकले नाहीत. चेतेश्वर पुजारा (25) , कर्णधार अजिंक्य रहाणे (37), मयांक अगरवाल (38) आणि यष्टिरक्षक रिषभ पंत (23) हे बिनीचे फलंदाज लवकर तंबूत परतले.

त्यामुळे हिंदुस्थानचा डाव एका वेळेस 6 बाद 186 अशा केविलवाण्या स्थितीत होता. संघाच्या डावाला आकार देण्याचे शिवधनुष्य मग मराठमोळा शार्दुल ठापूर आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या सातव्या जोडीने उचलले. संघाच्या या प्रमुख गोलंदाजांनी अगदी कसलेल्या फलंदाजांसारखे खेळत यजमान संघाचा तुफानी मारा बोथट केला. योद्धय़ाच्या थाटात या दोघांनी ऑस्टेलियन गोलंदाजांचे उसळते चेंडू अंगावर घेत 36 षटकांत 126 धावांचा विक्रमी पाऊस पाडला. ठापूरने 115 चेंडूंत 67 तर सुंदरने 144 चेंडूंत 62 धावांची झुंजार खेळी नोंदवत हिंदुस्थानच्या वतीने ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठीची 126 धावांची विक्रमी भागीदारी साकारली.

त्यामुळेच पहिल्या डावात सर्व बाद 369 अशी मजल मारणाऱया यजमान कांगारूंना केवळ 33 धावांची छोटी आघाडी घेता आली. त्यानंतर तिसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात बिनबाद 21 अशी मजल मारत आपली आघाडी 54 वर नेली. यावेळी सलामीवीर मार्क्स हॅरिस 1 तर डेव्हिड वॉर्नर 20 धावांवर खेळत होते. ठापूर आणि सुंदर या दोघांनीही चमकदार अर्धशतके साकारत संघाच्या डावालाही आकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर आजी-माजी क्रिकेटपटूंकडून काwतुकाचा वर्षाव होत आहे.

सातव्या क्रमांकावर येऊन ऑस्ट्रेलियात पदार्पणालाच सर्वोच्च धावसंख्या

  • खेळाडू धावा डाव मैदान कसोटी सुरू
  • वॉशिंग्टन सुंदर (हिंदुस्थान ) 62 दुसरा ब्रिस्बेन 15 जाने. 2021
  • फ्रँक पह्स्टर (इंग्लंड ) 56 दुसरा सिडनी 15 डिसें. 1911
  • फ्रान्सिस पर्ह्ड (इंग्लंड ) 48 तिसरा सिडनी 14 डिसें. 1894
  • युग जॅक हेअरने (इंग्लंड ) 43 चौथा सिडनी 15 डिसें. 1911
  • रॉय स्वेटमॅन (इंग्लंड ) 41 पहिला सिडनी 9 जाने. 1959
  • जेफ दुजॉन (वेस्ट इंडीज) 41 दुसरा मेलबेर्न 26 डिसे. 1981

वॉशिंग्टनने मोडला 110 वर्षांचा विक्रम

हिंदुस्थानच्या वॉशिंग्टन सुंदरने कसोटीतील पदार्पणातच ऑस्ट्रेलियन भूमीवर सातव्या क्रमांकावर येऊन वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवणाऱया इंग्लंडच्या फ्रँक फोस्टरचा 110 वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडण्याची किमया आज साधली. फोस्टरने 15 डिसेंबर 1911 ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस कसोटीत पदार्पणातच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. रविवारी ब्रिस्बेनच्या मैदानात हिंदुस्थानच्या वॉशिंग्टन सुंदरने 62 धावांची खेळी करीत हा शंभर वर्षांपूर्वीचा रेकाॅर्ड मोडला आहे.

‘ठाकूर, तुला पुन्हा मानले रे’, विराटकडून चक्क मराठीत काैतुक

अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसह क्रिकेटतज्ञांनाही आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारी भन्नाट फलंदाजी केली. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या या पठ्ठय़ाने आपल्या 67 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांची नोंद केली. ठाकूरचे हे कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठरले.

त्याने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने सध्या सुट्टीवर असणारा हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली याचेही मन जिंकले. विराटने शार्दुलच्या या खेळीचे काैतुक करताना चक्क ‘ठाकूर, तुला पुन्हा मानले रे’ असे मराठीत ट्विट केले. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या तळाच्या जोडीने दिलेली झुंज संघातील अन्य फलंदाजांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. हिंदुस्थानचा धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हटके अंदाजात या दोघांचे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या