हिंदुस्थानविरुद्ध बांगलादेशची कसोटी

32

हैदराबाद – रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या आणि विजयाचा अश्वमेध चौफेर उधळत असलेल्या ‘नंबर वन’ हिंदुस्थानविरुद्ध उद्यापासून बांगलादेश एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बांगलादेशचा संघ कसोटी दर्जा मिळाल्यापासून हिंदुस्थानमध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच कसोटी सामना खेळण्यासाठी हिंदुस्थान दौऱयावर आलेल्या बांगलादेशची यजमानांविरुद्ध खरी ‘कसोटी’ असेल.

न्यूझीलंड आणि इंग्लंडवर निर्भेळ यश संपादन केल्याने हिंदुस्थानचा कसोटी संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक सनसनाटी विजय मिळविलेल्या बांगलादेशला कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही. मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध साडेपाचशेच्या आसपास धावा केल्यानंतरही बांगलादेशला पराभव पत्करावा लागला होता. याचाच अर्थ कसोटी सामना कसा जिंकायचा याचा फार्म्युला अद्याप बांगलादेशला सापडलेला नाही. गतवेळी हिंदुस्थानने बांगलादेशमध्ये कसोटी सामना खेळला होता, मात्र त्यावेळी पावसाने बांगलादेशला पराभवापासून वाचविले होते. आता तर मुस्तफिजुर रहमानसारखा तुफानी गोलंदाजही बांगलादेशच्या मदतीला नाहीये.

हिंदुस्थानकडे खेळाडूंची कमतरता नसल्याने अंतिम ११ खेळाडूंचा संघ निवडताना यावेळी संघनिवड समिती आणि कर्णधार विराट कोहलीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. संघात पुनरागमन केलेल्या अभिनव मुकुंदला अंतिम ११ मध्ये खेळण्यासाठी अजूनही वाट बघावी लागेल. कारण लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा व स्वतः कोहली आघाडीच्या फळीत खेळतील. हिंदुस्थानसाठी त्रिशतक ठोकणाऱया करुण नायरला संधी मिळते की अजिंक्य रहाणेसाठी त्याला बाहेर बसावे लागते हे उद्याच समजेल. कारण कोहलीने रहाणेला पसंती दिलेली आहे.

बांगलादेशविरुद्धही हिंदुस्थान पाच गोलंदाजांच्या साथीने मैदानावर उतरेल. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा ही फिरकीची जोडगोळी हिंदुस्थानचे ब्रह्मास्त्र होय. या जोडीपुढे फलंदाजी करताना तमिम इक्बाल, सौम्य सरकार व महमूदुल्लाह रियाद यांना धावा करणे सोपे नसेल. मागच्या कसोटीत फतुल्लाहमध्ये अश्विनने बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली होती. यावेळी उमेश यादव व ईशांत शर्मा या हिंदुस्थानच्या वेगवान तोफाही उसळत्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या फलंदाजांवर तिखट मारा करण्यासाठी सज्ज आहेत. संघात यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेलऐवजी वृद्धिमान साहाला संधी मिळेल तर फिरकीपटू अमित मिश्रा जायबंदी झाल्याने त्याच्या जागेवर नवा चेहरा कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांडय़ा अष्टपैलू गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वी कोहलीला त्याच्या क्षमतेचा अंदाज येईल. बांगलादेशची मदार फिरकीपटू शाकिब अल हसन व युवा खेळाडू मेहदी हसन मिराज यांच्यावर असेल.

उभय संघ

हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांडय़ा, अभिनव मुकुंद, कुलदीप यादव.

बांगलादेश – मुशफिकर रहीम (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्य सरकार, महमूदुल्लाह रियाद, मोमिनुल हक, शब्बीर रहमान, शाकिब अल हसन, लिटोन दास, तस्कीन अहमद, मेहदी हसन मिराज, मुसद्देक हुसेन, कामरूल इस्लाम रब्बी, शुभाशीष राय, तैजुल इस्लाम, शफीउल इस्लाम.

दृष्टिक्षेपात

तब्बल १७ वर्षांनंतर बांगलादेशचा संघ प्रथमच हिंदुस्थानात कसोटी सामना खेळणार.

बांगलादेशला २००० साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता.

उभय संघात आतापर्यंत आठ कसोटी लढती झाल्या असून त्यात सहा हिंदुस्थानने जिंकल्या तर २ ड्रॉ झाल्या.

‘बांगलादेशकडे प्रतिभावान क्रिकेटपटूंची कमतरता नाही. त्यांना केवळ अनुभवाची गरज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या संघाचे चांगली प्रगती केलीय. त्या तुलनेत त्यांचा कसोटी संघ अननुभवी आहे. मात्र अधिकाधिक कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्यास बांगलादेश हा कसोटीतीलही चांगला संघ बनू शकतो. मात्र गुरुवारपासून सुरू होत असलेल्या एकमेव कसोटीत हिंदुस्थान बांगलादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही.’ – विराट कोहली (कर्णधार, हिंदुस्थान)

आपली प्रतिक्रिया द्या