IND VS ENG : हैदराबादचा ‘लक्ष्मण’ हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण

सामना ऑनलाईन । ओव्हल

हैदराबादचा लक्ष्मण अशी ओळख असलेल्या हनुमा विहारी याचा इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीसाठी अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने त्याला कॅप दिली.

हिंदुस्थानने या सामन्यात दोन बदल केले आहेत. फिरकीपटू आर. अश्विनच्या जागी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. तर हार्दिकच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा हनुमा 292 वा खेळाडू आहे.

हनुमा विहारी या 24 वर्षीय खेळाडूने 2012मध्ये अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थाचे प्रतिनिधित्व केले आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हनुमाने दमदार कामगिरी करत संघात स्थान मिळवले आहे. हनुमाने आतापर्यंत 59 फर्स्ट क्लास सामन्यात 61.02 च्या सरासरीने 4821 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकताच हिंदुस्थानचा अ संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता या संघात हनुमाचा समावेश होता. इंग्लंड-अ संघाविरुद्ध झालेल्या 4 एक दिवसीय सामन्यात त्याने 291 धावा चोपल्या होत्या. यात त्याने 1 शतकही ठोकले होते. इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्टीवर हनुमाची ही कामगिरी लक्षात घेऊन निवड समितीने त्याला अंतिम 11 मध्ये संधी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या