राहुलचा झंझावात, श्रेयसची आतिषबाजी टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यात शानदार विजय

सलामीवीर के एल राहुलची 27 चेंडूंत 56 धावांची झंझावाती खेळी आणि त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यरने साकारलेली 29 चेंडूंत नाबाद 58 धावांची आतिषबाजीच्या बळावर टीम इंडियाने आपल्या न्यूझीलंड दौऱ्याची बोहनी पहिल्या टी-20 तील शानदार विजयाने केली. पहिल्या सामन्यातील विजयासह हिंदुस्थानने टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली आहे.

वेलिंग्टनच्या पहिल्या टी-20 लढतीत विजयासाठी 204 धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या डावाची सुरुवात खराबच झाली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तातच माघारी परतला. त्याने केवळ 7 धाव केल्या. त्यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करीत डावाची अधिक पडझड होऊ दिली नाही. लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने 7.2 षटकांत 99 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दरम्यान राहुलने आपले अर्धशतकही साजरं केलं. 56 धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. विराटने 32 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. राहुलने आपल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 3 षटकारांची नोंद केली.

मुंबईकर श्रेयस बरसला

श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसने 29 चेंडूंत 58 धावांची बहारदार नाबाद खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. मनीष पांडेनेही 12 चेंडूंत नाबाद 14 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला

त्याआधी, कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर कॉलिन मुनरो आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात 203 धावांपर्यंत मजल मारली. घरचा हंगाम गाजवल्यानंतर न्यूझीलंडच्या मैदानावर टीम इंडियाच्या गोलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लागला. मात्र मधल्या सत्रात हिंदुस्थानी गोलंदाजांनीही दमदार पुनरागमन केलं. मुनरोने 59, टेलरने नाबाद 54 तर विल्यमसनने 51 धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांचा फारसा अंदाज न आल्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वैर मारा केला. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने मार्टीन गप्टीलला माघारी धाडण्यात यश मिळवलं, आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.यानंतर कॉलिन मुनरोने कर्णधार विल्यमसनच्या साथीने धावांचा ओघ वाढवत आपलं अर्धशतक झळकावलं. शार्दुल ठाकूरने त्याला माघारी धाडल्यानंतर कर्णधार विल्यमसनने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत फटकेबाजीला सुरुवात केली. विल्यमसनही अर्धशतक झळकावल्यानंतर माघारी परतला. मधल्या षटकांमध्ये हिंदुस्थानी गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

संक्षिप्त धावसंख्या

  • न्यूझीलंड : 20 षटकांत 5 बाद 203
  • हिंसुस्थान : 19 षटकांत 4 बाद 204
  • मॅन ऑफ दि मॅच : श्रेयस अय्यर

हिंदुस्थानची अनोखी कामगिरी

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे करणाऱ्या संघाच्या यादीत हिंदुस्थान पहिल्या स्थानी आहे. 200 पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करण्याची टीम इंडियाची ही चौथी वेळ ठरली.हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि कतार या देशांनीही एकवेळा 200 पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या