टीम इंडियाला भासतेय ‘या’ खेळाडुची उणीव, प्रवासादरम्यान खुर्चीही ठेवतात मोकळी

2433

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या दोन लढतींमध्ये टीम इंडियाने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये उद्या 29 जानेवारीला होणार असून टीम इंडियाचे खेळाडु येथे दाखलही झाले आहे. हॅमिल्टनकडे प्रवास करताना बसमध्ये टीम इंडियाच्या खेळाडुंना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चांगलीच उणीव भासत असल्याचे दिसते.

बीसीसीआयने फिरकीपटू युझवेंद्र चहल याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तिसऱ्या टी-20 लढतीसाठी ऑकलंडमधून हॅमिल्टनकडे बसने जाताने युझवेंद्र चहल याने सहकारी खेळाडुंची मुलाखत घेतली. यावेळी युझवेंद्र चहल याने टीम इंडियाचे खेळाडू मैदानापासून लांब असणाऱ्या धोनीची आठवण काढत असल्याचे सांगितले.

मुलाखतीदरम्यान युझवेंद्र चहल महेंद्रसिंह धोनी बसमध्ये ज्या जागेवर बसायचा त्या जागी जातो. ही ती जागा ज्यावर एक दिग्गज खेळाडू बसतो. माही भाई… आता या ठिकाणी सध्या कोणीही बसत नाही. आम्हाला त्याची खुप आठवण येते, असे धोनीच्या जागेकडे इशारा करून युझवेंद्र चहल म्हणतो.

विश्वचषकापासून संघातून बाहेर
महेंद्रसिंह धोनी याने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून मैदानात पाऊल ठेवलेले नाही. धोनीने आपला अखेरचा सामना विश्वचषकामध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या लढतीबाबत बोलताना युझवेंद्र चहल याने सांगितले की, न्यूझीलंडविरुद्ध धोनी बाद झाला तेव्हा तो खुप दु:खी होता आणि आम्ही त्याचा तो चेहरा विसरू शकत नाही. माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते. धोनी बाद झाल्यानंतर आमच्यासाठी वर्ल्डकपचा प्रवास संपल्याची जाणीव झाली असेही त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या