तिसरी वन डे पावसाने, तर मालिका न्यूझीलंडने जिंकली

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ख्राईस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवला गेलेला तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. न्यूझीलंडने विजयासाठी 220 धावांचे आव्हान घेऊन खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी 18 षटकांत 1 विकेट गमावून 104 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पहिला सामना जिंकणाऱया न्यूझीलंडने 3 वन डे सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 47.3 षटकांत केवळ 219 धावांपर्यंतच मजल मारता आली. अन्य स्टार फलंदाज अपयशी ठरत असताना वॉशिंग्टन सुंदरने (51) अर्धशतक झळकावले, तर श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. ऍडम मिल्ने आणि डेरील मिशेल यांच्या वेगवान माऱयापुढे हिंदुस्थानी स्टार फलंदाजांनी आत्मघातकी फटके मारत आपल्या विकेट बहाल केल्या.