पाकिस्तानविरुद्ध ‘हाय व्होल्टेज’ लढतीत विराट-रोहितमध्ये झाली होती टक्कर, धोनी झाला प्रचंड नाराज

2960

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा आहेत. एक विस्फोटक तर दुसरा मैदानात शड्डू ठोकून गोलंदाजांची धुलाई करण्यात माहीर. सध्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटला ब्रेक लागला असून खेळाडू सोशल मीडियावर भरभरून बोलत आहेत. असाच एक किस्सा विराट कोहली याने फिरकीपटू आर. अश्विनसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटदरम्यान सांगितला.

2012 मध्ये आशिया कप स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने आले होते. या लढतीसह विराटने अनेक किस्से सांगितले. या लढतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मैदानात जबरदस्त टक्कर झाली होती.

हिंदुस्थानचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना विराट डीप मिड विकेटला उभा होता, तर रोहित शर्मा डीप स्केअर लेगला उभा होता. अश्विन च्या गोलंदाजीवर पाकिस्तानी फलंदाजाने चेंडू टोलवला. रोहित आणि विराट दोघेही चेंडू पकडण्यासाठी धावले. दोघांनी एकमेकांना कॉल न केल्याने त्यांच्यात टक्कर झाली आणि विराटचे डोके रोहितच्या खांद्याला आदळले.

दोघांची टक्कर झाल्याने पाकिस्तानी फलंदाजांनी याचा फायदा उठवत तीन धावा पळून काढल्या. जिथे फक्त एक धाव होती तिथे तीन धावा गेल्याने धोनी प्रचंड नाराज झाला होता. तुम्ही दोघे अशा धसमूसळेपणाने कसे खेळू शकता अशी धोनीची प्रतिक्रिया होती, असे विराट सांगतो. परंतु याच लढतीत विराटने 183 धावांची खेळी केली होती आणि पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला होता.

ढाका येथे रंगला सामना
बांगलादेशमधील ढाका येथे हा सामना रंगला होता. पाकिस्तानने नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीझच्या शतकी खेळीच्या बळावर 6 बाद 329 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर 52 धावा, रोहित शर्मा 68 धावा आणि विराट कोहली 183 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या