निर्णायक सामन्यात हिंदुस्थानचा रोमहर्षक विजय, मालिका २-१ ने जिंकली

सामना ऑनलाईन । केपटाऊन

दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्याचा शेवट हिंदुस्थानने विजयाने केला आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळवत हिंदुस्थानने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानने आफ्रिकेवर ७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हिंदुस्थानने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २० षटकात ६ बाद १६५ धावाच करू शकला. सुरेश रैनाला सामनाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेला १० धावांवर पहिला धक्का बसला. भुवीने हेन्ड्रिक्सला बाद ७ धावांवर बाद केले. सलामीला आलेल्या डेव्हिड मिलरने २३ चेंडूत २४ धावांची संथ खेळी केली. रैनाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकडे झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर कर्णधार ड्यूमिनी (५५) आणि ख्रिस्तियन जॉन्कर (४९) यांनी आफ्रिकेला विजय मिळवून देण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला. मात्र आवश्यक धावगती न साधू शकल्याने आफ्रिकेला ७ धावांनी पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाकडून भुवीने २, तर बुमराह, शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या आणि सुरेश रैनाला प्रत्येकी एक बळी मिळाला.

त्याआधी निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ड्यूमिनीने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभळणारा रोहित शर्मा अखेरच्या टी-२०मध्येही कमाल दाखवू शकला नाही. ८ चेंडूत ११ धावा काढून तो बाद झाला. शिखर धवन आणि सुरेश रैनाने मोर्चा सांभाळत हिंदुस्थानला अर्धशतकीय टप्पा ओलांडून दिला. तुफानी खेळी करणारा रैना २७ चेंडूत ४३ धावा काढून बाद झाला. मागील सामन्यात धुव्वाधार खेळी करणारा मनिष पांड्या फक्त १३ धावा काढून बाद झाला. दुसऱ्या बाजूने सावध खेळी करणारा धवनही ४७ धावांवर बाद झाल्याने हिंदुस्थानचा डाव कोसळतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. मात्र हार्दिक पांड्या (२१), धोनी (१२) आणि कार्तिकने (१३) धावांची छोटी पण उपयुक्त खेळी केल्याने हिंदुस्थानला २० षटकात ७ बाद १७२ धावा उभारत्या आल्या. आफ्रिकेकडून ज्युनिअर दालाने ३, ख्रिस मॉरिस २ आणि शम्सीने १ बळी घेतला.

आफ्रिकेचा ऐतिहासिक दौरा
दक्षिण आफ्रिकेत तब्बल दीड महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या दौऱ्यात हिंदुस्थानने दमदार प्रदर्शन केले. सुरुवातीला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-२ असा पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानने एक दिवसीय मालिकेत झोकात पुनरागमन केले आणि ‘न भुतो’ प्रदर्शन करत आफ्रिकेला चारिमुंड्या चीत केले. सहा एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ फक्त १ सामना जिंकू शकला. हिंदुस्थानने आफ्रिकेचा एक दिवसीय मालिकेत ५-१ असा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतही यजमान संघावर वर्चस्व गाजवत हिंदुस्थानने २-१ अशा फरकाने मालिका खिशात घातली.

आपली प्रतिक्रिया द्या