मयांक पुन्हा बरसला सलग दुसऱ्या कसोटीत शतक 108 धावा

353
mayank-agarwal

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यावर खरे तर पावसाचे सावट असल्याने क्रिकेटशौकिनांमध्ये धाकधुक होती, मात्र मैदानावर पाऊस काही पडला नाही. पण सलामीवीर मयांक अग्रवाल चांगलाच बसरला. त्याने सलग दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची पिसे काढताना झुंजार शतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनीही आकर्षक अर्धशतके झळकावून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हिंदुस्थानने पहिल्या दिवसअखेर 85.1 षटकांत 3 बाद 273 धावसंख्येपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे 5 षटके आधीच खेळ थांबविण्यात आला तेव्हा कर्णधार विराट कोहली 63, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत होते.

रोहित शर्मा फ्लॉप

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू झालेल्या या लढतीत हिंदुस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत सलामीला पदार्पण करताना दोन्ही डावात शतके ठोकून ऐतिहासिक कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसऱया कसोटीत मात्र फ्लॉप ठरला. वेर्नोन फिलॅण्डर व कॅगिसो रबाडा या वेगवान जोडगोळीने रोहितला पहिल्या सत्रात जखडून ठेवण्यात यश मिळवले. जेमतेम 35 चेंडूंचा सामना करणाऱया रोहितने एका चौकारासह 14 धावा करता आल्या. रबाडाच्या एका भन्नाट चेंडूवर रोहित चकला अन् बॅटला चटून चेंडू यष्टीमागे डिकॉकच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.

धुक्यामुळे उपाहारानंतर लावले फ्लड लाइट

आकाशात दाटलेले काळे ढग आणि धुक्यामुळे उपाहारानंतर मैदानावर फ्लड लाइट लावावे लागले, मात्र तरीही अंधुक प्रकाशामुळे पंचांनी पाच षटके आधीच खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.

शाळकरी मुलांचा उत्साह

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अभिनव उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत तिकिटे देण्यात आली होती. प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहण्यासठी आलेल्या या शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता. बेंबीच्या देठापासून ओरडून ते आपल्या स्टार खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. हडपसर येथील महापालिका शाळा क्रमांक 100 बी, शिरूर येथील सेवाधाम मतिमंद विद्यालय, पोदार हायस्कूल, कात्रज येथील सरहद स्कूल, आंबेगाव येथील उत्कर्ष स्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी पुण्यातील कसोटी सामन्याचा आनंद लुटला.

सलग दुसरे यश

आघाडीला आलेल्या मयांक अग्रवालने फिलॅण्डरला चौकार ठोकून सलग दुसऱया कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने केशव महाराजला सलग 2 षटकार ठोकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मयांकने 108 धावांच्या खेळीत 195 चेंडूंना सामोरे जाताना 2 टोलेजंग षटकारांसह 16 चेंडू सीमापार धाडले. शेवटी रबाडानेच त्याला डुप्लेसिसकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा बळी मिळवून दिला. त्यानंतर कोहली व आलेला रहाणे यांनी दक्षिण आफ्रिकेला आणखी यश मिळू दिले नाही.

मयांक-पुजाराची शतकी भागीदारी

रोहित बाद झाल्यानंतर दुसरा आघाडीवीर मयांक अग्रवाल व आलेला चेतेश्वर पुजारा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केल्याने उपहारापर्यंत हिंदुस्थानने 25 षटकांत 1 बाद 77 धावा केल्या. पुन्हा मैदानात आल्यानंतर या जोडीने दुसऱया विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. रबाडानेच चेतेश्वर पुजाराला पहिल्या स्लिपमध्ये डुप्लेसिसकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. पुजाराने 112 चेंडूंत 58 धावा फटकावताना 1 षटकार व 9 चौकारांच्या सहाय्याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखविला.

आपली प्रतिक्रिया द्या