#INDvSA रोहित शर्माच्या ‘हिट’ शोमुळे दोन मित्रांची कसोटी कारकीर्द धोक्यात

1990

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत आफ्रिकेवर एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला व पाहुण्या संघाला 3-0 असा व्हाईटवॉश दिला. पहिल्या डावात 212 धावाची द्विशतकी खेळी करणाऱ्या आणि संपूर्ण मालिकेत दोन शतक आणि एक द्विशतक ठोकणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर किताब देण्यात आला. रोहितने सलामीला खेळताना पहिल्याच मालिकेत हा पुरस्कार पटकावत ‘हिटमॅन’ या बिरुदाला चार चाँद लावले.

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने कसोटीत सलामीला खेळताना पहिल्याच मालिकेत आपली छाप उमटवली आहे. रोहितने मालिकेत चार डावात फलंदाजी करताना दोन शतक आणि एका द्विशतकासह 132.25 च्या सरासरीने 529 धावा चोपल्या. या दरम्यान त्याने 62 चौकार आणि 19 षटकारांची आतिषबाजी केली. रोहित शर्माच्या या ‘हिट’ शो मुळे टीम इंडियातील त्याच्या दोन मित्रांची कसोटी कारकिर्द धोक्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितने तीन शतकं साजरी केली. यात विशेष म्हणजे त्याने सलामीला खेळताना जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे शिखर धवन आणि केएल राहुल यांची कारकिर्द धोक्यात आली आहे. रोहित दोघांचाही चांगला मित्र आहे. परंतु दोघेही सध्या फॉर्मात नाहीत, त्यामुळे आगामी काळात त्यांना कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या