गोलंदाजांचा पॉवरफुल शो! ‘टीम इंडिया’ निर्भेळ यशापासून दोन पावले दूर

509

ज्या खेळपट्टीवर एकटय़ा रोहित शर्माने पहिल्या डावात 212 धावा चोपून काढल्या, त्याच रांचीच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना मिळून त्याच्याएवढय़ा धावाही जमविता आल्या नाहीत. तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘टीम इंडिया’च्या 497 (घोषित) धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाचा पहिला डाव 56.2 षटकांत 162 धावांत संपुष्टात आल्याने विराट सेनेला 335 धावांची मोठी आघाडी मिळाली. मग दक्षिण आफ्रिकेवर सलग दुसऱ्या कसोटीत फॉलोऑन लादून हिंदुस्थानने त्यांची तिसऱ्या दिवसअखेर उर्वरित 46 षटकांच्या खेळात 8 बाद 132 धावा अशी दाणादाण उडवली.

सोमवारचा खेळ थांबला तेव्हा थ्युनिस डी ब्रुयन 30, तर ऍनरिच नॉर्खिया 5 धावांवर खेळत होते. हिंदुस्थानी गोलंदाजांनी पावरफुल शो सादर करताना तब्बल 16 फलंदाजांना बाद करून सोमवारचा दिवस गाजविला. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असला तरी ‘टीम इंडिया’ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यशापासून केवळ दोन पाऊल दूर आहे.

दुसऱ्या दिवसाच्या 2 बाद 9 धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. उमेश यादवने कर्णधार फाफ डू प्लेसिसचा (1) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सकाळी सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर झुबेर हमजा (62) व तेम्बा बावूमा (32) यांनी काही वेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. रवींद्र जाडेजाने हमजाच्या यष्टय़ा उडवून ही जोडी फोडली. मग पदार्पणवीर शाहबाझ नदीमने बावूमाला साहाकरवी यष्टिचित करून कसोटी बळीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर जाडेजाने हेन्रीक क्लासेनचे (6) दांडके उडवून हिंदुस्थानला सहावे यश मिळवून दिले. शेवटी जॉर्ज लिंडेने (37) ऍनरिक नॉर्खियाच्या (4) साथीने 32 धावांची भागीदारी केली म्हणून दक्षिण आफ्रिकेला दीडशेचा टप्पा ओलांडता आला. हिंदुस्थानकडून उमेश यादवने 3, तर मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम व रवींद्र जाडेजा यांनी 2-2 बळी टिपले.

कोहलीने अझरुद्दीनचा विक्रम मोडला
विक्रमांचे इमल्यावर इमले रचत चाललेला ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सोमवारी आणखी एक विक्रम जमा झाला. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आठव्यांदा प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादून मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने सात वेळा फॉलोऑन लादला होता. अझरुद्दीनने 47 कसोटी सामन्यांत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना ही उपलब्धी मिळविली होती. कोहलीने 51 व्या कसोटीत अझरुद्दीनचा हा विक्रम मोडला. महेंद्रसिंग धोनीने 60 सामन्यांत पाच वेळा, तर सौरव गांगुलीने 49 सामन्यांत 4 वेळा प्रतिस्पर्धी संघांवर फॉलोऑन लादला होता.

संक्षिप्त धावफलक 
हिंदुस्थान पहिला डाव-9 बाद 497 धावा (घोषित).
दक्षिण आफ्रिका पहिला डाव-56.2 षटकांत 162 धावा.

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव-

डीन एल्गर रिटायर्ड हर्ट 16, क्विंटॉन डी कॉक त्रि. गो. यादव 5, झुबेर हमजा त्रि. गो. शमी 0, फाफ डू प्लेसिस पायचित गो. शमी 4, तेम्बा बावूमा झे. साहा गो. शमी 0, हेन्रीक क्लासेन पायचित गो. यादव 5, जॉर्ज लिंडे धावबाद (नदीम) 27, डॅन पिईड्ट त्रि. गो. जाडेजा 23, डी ब्रुयन खेळत आहे 30, कॅगिसो रबाडा झे. जाडेजा गो. अश्विन 12, ऍनरिच नॉर्खिया खेळत आहे 5.
अवांतर-5, एकूण-46 षटकांत 8 बाद 132 धावा.

बाद क्रम-1-5, 2-10, 3-18, 4-22, 4-26ग-5-36, 6-67, 7-98, 8-121.

गोलंदाजी-मोहम्मद शमी 9-5-10-3, उमेश यादव 9-1-35-2, रवींद्र जाडेजा 13-5-36-1, शाहबाझ नदीम 5-0-18-0, रविचंद्रन अश्विन 10-3-28-1.

फॉलोऑननंतरही लोटांगण
सलग दुसऱ्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की पत्करून खेळायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही हिंदुस्थानच्या वेगवान माऱ्यापुढे लोटांगण घातले. उमेश यादवने दुसऱ्याच षटकात क्विंटॉन डी कॉकचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला पुन्हा एकदा आश्वासक सुरुवात करून दिली. मग मोहम्मद शमीने पुढच्याच षटकात पहिल्या डावातील अर्धशतकवीर झुबेर हमजाला भोपळाही फोडू न देता त्रिफळा उडवून तंबूत धाडले. कर्णधार फाफ डू प्लेसिस (4) व तेम्बा बावूमा (0) यांनाही शमीने लागोपाठच्या षटकात बाद करून दक्षिण आफ्रिकेची 8.3 षटकांत 4 बाद 22 अशी दुर्दशा केली.

एल्गरला दुखापत
सलामीवीर डीन एल्गरच्या (16) डोक्याला उमेश यादवचा उसळता चेंडू लागल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला अन् दक्षिण आफ्रिकेचा पाय आणखी खोलात गेला. मग उमेश यादवने हेन्रीच क्लासेनचा (6) बाद केल्यानंतर जॉर्ज लिंडे (27) व डॅन पिईड्ट (23) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे काही वेळ तग धरला. या दोघांसह कॅबिसो रबाडा (12) झाल्याने दक्षिण आफ्रिकेने पराभवाच्या दिशेने कुच केली. डी ब्रुयनने अखेरच्या षटकांमध्ये प्रतिकार केल्याने दक्षिण आफ्रिकेचे आजचे मरण उद्यावर गेले. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 3, तर उमेश यादवने 2 फलंदाज बाद केले. रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी 1-1 बळी टिपला.

आपली प्रतिक्रिया द्या