जाडेजा, कुलदीप, शमी, राहुल चमकले, हिंदुस्थान ३ बाद १३५ धावा

141

सामना ऑनलाईन, कोलंबो

हिंदुस्थान व श्रीलंकन अध्यक्षीय इलेव्हन यांच्यामध्ये शुक्रवारी दोनदिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. श्रीलंकन दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी चमक दाखवली. तसेच टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱया के. एल. राहुल याने फलंदाजीत शानदार कामगिरी केली. श्रीलंकन अध्यक्षीय संघाचा पहिला डाव ५५.५ षटकांत १८७ धावांमध्येच गडगडला. त्यानंतर हिंदुस्थानने पहिल्या दिवसअखेर ३ बाद १३५ धावा केल्या असून आता पाहुणा संघ ५२ धावांनी पिछाडीवर आहे.

दनुष्का गुणथिलका या सलामीवीराने ७४ धावांची तर कर्णधार लहिरू थिरीमाने याने ५९ धावांची खेळी साकारली, पण श्रीलंकन अध्यक्षीय संघाचा पहिला डाव १८७ धावांमध्येच आटोपला. मोहम्मद शमीने ९ धावा देत २ फलंदाज गारद केले. डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने १४ धावा देत ४ आणि रवींद्र जाडेजाने ३१ धावा देत ३ फलंदाज बाद करीत यजमानांच्या डावाला खिंडार पाडले.

हिंदुस्थानकडून अभिनव मुकुंद व कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा यांना फलंदाजीचा सराव करता आला नाही. विश्व फर्नांडोने अभिनव मुकुंदला शून्यावर तर चेतेश्वर पुजाराला १२ धावांवर बाद केले. त्यानंतर के. एल. राहुलने ७ चौकारांनिशी ५४ धावांची खेळी साकारली. आता विराट कोहली ३४ धावांवर तर अजिंक्य रहाणे ३० धावांवर खेळत आहेत.

चमिंडा वास बनला गोलंदाजी प्रशिक्षक
माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास आता श्रीलंकन गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. चम्पाका रामानायके यांनी गोलंदाजी प्रशिक्षकपदावरून माघार घेतल्यानंतर चमिंडा वासच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

चंडीमल आजारी; कसोटीला मुकणार
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल याला न्यूमोनिया झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्धच्या किमान पहिल्या कसोटीला तो मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिनेश चंडीमलऐवजी रंगाना हेराथच्या खांद्यावर श्रीलंकन संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या