लंकेचा ‘डाव’ वरचढ, हिंदुस्थान बॅकफुटवर

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये हिंदुस्थानचा संघ संकटामध्ये सापडला आहे. तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा डाव १७२ धावांत गुंडाळल्यानंतर पाहुण्या लंकेने दिवसअखेर ४ बाद १६५ धावा करत यजमानांना बॅकफुटवर ढकलले आहे. खेळ थांबला तेव्हा लंकेचा संघ हिंदुस्थानपेक्षा फक्त ७ धावांनी पिछाडीवर होता. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात लंकेचा डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे.

हिंदुस्थानचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात

हिंदुस्थानचा पहिला डाव १७२ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या लंकेला २९ धावांची सलामी मिळाली. भुवनेश्वर कुमारने सलामीवीर दिमुथ करुणरत्नेला ८ धावांवर पायचीत करत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. लंकेच्या डावात आणखी ५ धावांची भर पडत नाही तोच दुसरा सलामीवीर समरविक्रमाला २३ धावांवर शाहकरवी झेलबाद केले. ३४ धावांमध्ये दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर लंकेचा डाव कोसळणार असे वाटत असताना लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज या जोडीने श्रीलंकेचा डाव सावरला.

पुन्हा पाऊस, हिंदुस्थान ५ बाद ७४!

थिरीमने आणि मॅथ्यूज या जोडीने ९९ धावांची भागीदारी करत हिंदुस्थानच्या गोलंदाजीची हवा काढून घेतली. अर्धशतकानंतर दोन्ही फलंदाज बाद झाले. थिरीमनेने ५१ धावा केल्या, तर मॅथ्यूजने ५२ धावा केल्या. दोघांनाही वेगवान गोलंदाज उमेश यादवने बाद केले. त्यानंतर दिवसभर कर्णधार चंडीमल आणि डिकवेलाने नांगर टाकल्याने हिंदुस्थानला अधिक यश मिळाले नाही. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला तेव्हा श्रीलंकेचा डाव ४ बाद १६५ धावांवर पोहोचला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी यजमान संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न लंकेचा असणार आहे. तर, लंकेला लवकरात लवकर गुंडाळून कसोटीमध्ये परत येण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे.

…म्हणून तिसरे पंच मैदानावर उतरले

त्याआधी हिंदुस्थानने आपला पहिला डाव कालच्या ५ बाद ७५ धावावरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी पहिल्या काही षटकात हिंदुस्थानला तीन धक्के बसले. दुसऱ्या दिवशी ४७ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारा अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाला. पुजाराने ५२ धावा केल्या. पुजारा बाद झाल्यानंतर साहा आणि जाडेजाने सातव्या विकेटसाठी सर्वाधिक ४८ धावांची भागीदारी केली. वृद्धीमान साहाने २४ आणि रविंद्र जाडेजाने २२ धावा केल्या. त्यानंतर तळाचा फलंदाज मोहम्मद शमीच्या २४ धावांच्या जोरावर हिंदुस्थानी संघाला १७२ धावांची मजल मारता आली. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने चार विकेट्स घेतल्या तर दासून शनाका दिलरुवान परेरा आणि लाहिरु गमगेने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या