कोलकाता कसोटीत हिंदुस्थानचे पुनरागमन, लंकेवर ४९ धावांची आघाडी

29

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला आहे. चौथ्या दिवशी हिंदुस्थानने लंकेचा पहिला डाव २९४ धावांत गुंडाळत, दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात १ बाद १७१ अशी मजल मारली आहे. हिंदुस्थानने लंकेवर ४९ धावांची आघाडी घेतली असून सामन्याचा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहण्याची जास्त शक्यता आहे. मात्र पाचव्या दिवशी हिंदुस्थानने पहिल्या सत्रामध्ये वेगाने धावा करत लंकेसमोर निर्णायक आव्हान ठेवल्यास सामना रंगतदार होऊ शकतो.

श्रीलंकेची अखिलाडीवृत्ती, बाद दिलेल्या खेळाडूला ड्रेसिंगरूममधून इशारा

श्रीलंकेने पहिल्या डावात २९४ धावा करत हिंदुस्थानवर १२२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हिंदुस्थानने दमदार उत्तर देत सामन्यात पुनरागमन केले आहे. शिखर धवन आणि के.एल. राहुल यांनी डावाची सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी दीडशतकी सलामी दिली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.

अंपायरच्या दुर्लक्षामुळे तिसऱ्या कसोटीत हिंदुस्थानला ५ धावांचं नुकसान

राहुलपेक्षा शिखर धवन आज आक्रमक अंदाजात खेळत होता. मात्र शिखर धवनचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. धवनने ११६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ९४ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पुजाराने राहुलच्या सोबत शेवटची काही षटकं खेळून काढत दिवसभरात आणखी पडझड होऊ दिली नाही. खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थानच्या १ बाद १७१ धावा झाल्या होत्या आणि लंकेवर ४९ धावांची आघाडी मिळवली होती. राहुल ११३ चेंडूत ७३ धावा आणि पुजारा ९ चेंडूत २ धावा करून नाबाद होते. लंकेकडून दसून शनाकाला शिखर धवनचा एकमेव बळी मिळाला.

तत्पूर्वी चौथ्या दिवशी तळाच्या फंलदाजांनी नांगर टाकल्याने हिंदुस्थानला लंकेचा डाव लवकर गुंडाळण्यात अपयश आले. लंकेने कालच्या ४ बाद १६५ धावांवरून पुढे खेळताना पहिले तीन बळी झटपट गमावले. सकाळच्या सत्रात भुवी आणि शामीने शानदार गोलंदाजी करत लंकेला पाठोपाठ धक्के दिले. लंकेला २०० धावांवर पाचवा धक्का बसला. डिकवेलाला शामीने ३५ धावांवर कोहलीकरवी झेलबाद करत आजच्या दिवशीचे पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फक्त एका धावेचे अंतराने दसून शनाकाला भुवीने शुन्यावर माघारी धाडले. त्याच धावसंख्येवर कर्णधार चांडीमलही २८ धावांवर बाद झाल्यानं लंकेचा डाव संकटात सापडला. शामीने चांडीमला बाद केले.

एकाच धावसंख्येवर तीन बळी गेल्याने लंकेचा डाव गडगडणार आणि हिंदुस्थान सामन्यात मुसंडी मारणार असे वाटत असताना लंकेच्या शेपटाने जोरदार तडाखा दिला. परेरा आणि हेराथ यांच्यात ४३ धावांची भागिदारी झाली. त्यानंतर हेराथ आणि लकमल यांनी ४६ धावांची भागिदारी करत लंकेला शंभराच्यावर आघाडी मिळवून दिली. हेराथने १०५ चेंडूत ९ चौकारांसह ६७ धावा केल्या. हिंदुस्थानकडून भुवी आणि शामीने प्रत्येकी ४ बळी घेतले. तर, यादवला दोन बळी मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या