तोच संघ कायम राहणार का बुमराहला विश्रांती देणार ?

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. हिंदुस्थानी संघाने सलग सहा सामने जिंकले असून उपांत्य फेरी गाठण्याची टीम इंडियाला नामी संधी आहे. टीम इंडियाचा मुकाबला आज (2 नोव्हेंबर) श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. जसप्रीत बुमराहने या सामन्यासाठी विश्रांतीची विनंती केली तरच संघात बदल होण्याची शक्यता आहे. त्याला विश्रांती दिल्यास शार्दुल ठाकूरला या सामन्यासाठी संधी मिळू शकते. सलग सहा सामने जिंकणाऱ्या टीम इंडियासमोर आतापर्यंत कोणताही संघ तगडे आव्हान उभे करू शकलेला नाहीये. हिंदुस्थानी संघाने प्रत्येक विभागात जगज्जेत्यासारखी कामगिरी केली आहे. आत्मविश्वास दुणावला असल्याने कठीण परिस्थितीतूनही संघाने स्वत:ला सावरत विजय मिळवला आहे.