मंधाना-जेमिमा जोडीची धमाल शतकी भागीदारी, विंडीजविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली

3213

अँटिग्वा-मराठमोळी स्मृती मंधाना (74) आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (69) यांच्या धडाकेबाज 141 धावांच्या सलामीच्या भागीदारीच्या बळावर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज महिला संघावर 6 विकेट राखून मात केली. महिला संघाने तिसरी वन डे लढत जिंकली आणि विंडीजला घरच्या मैदानावरील तीन लढतीच्या मालिकेत 2-1 असे पराभूत केले. स्मृती मंधानाने या लढतीतील “प्लेअर ऑफ मॅच”चा पुरस्कार पटकावला.

तिसऱ्या लढतीत नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. विंडीजच्या निम्मा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरचे अर्धशतक आणि अखेरच्या फळीत स्टेसी किंगने फटकेबाजी करीत तिला दिलेल्या साथीमुळे विंडीजच्या महिलांनी 50 षटकांत 194 धावांपर्यंत मजल मारली. टेलरने ७९ धावा केल्या तर किंग 38 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत उत्तम साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानी रणरागिणींनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी 25 षटकांत पहिल्या विकेटसाठी 141 धावांची धडाकेबाज शतकी भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यानच विंडीजचा पराभव निश्चीत झाला होता. स्मृती मंधानाने 74 तर रॉड्रीग्जने 69 धावा केल्या. या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी फटकेबाजी करत हिंदुस्थानला विजयाच्या समीप आणून सोडलं. मात्र या दोघी बाद झाल्यानंतर दिप्ती शर्माने हिंदुस्थानी विजयावर शिक्कामोर्तब केले.

आपली प्रतिक्रिया द्या