IND VS WI : दुसऱ्या ‘वन डे’चे ठिकाण बदललं, ‘येथे’ रंगणार सामना

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातीत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारी राजकोट येथे सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेनंतर पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 24 ऑक्टोबरला इंदूर येथे खेळला जाणार होता. परंतु आता या सामन्याचे ठिकाण बदलून विशाखापट्टनम करण्यात आले आहे. बीसीसीआयने बुधवारी सामन्याच्या ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

इंदूर येथील सामना विशाखापट्टनम येथे हलवण्यात आला याचे कारण एमपीसीए अर्थात मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयमध्ये मतभेद हे आहे. बीसीसीआय आणि एमपीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तिकिटांच्या विक्रीवरून वाद झाला होता. यामुळे बीसीसीआयने सामना दुसऱ्या मैदानावर हलवण्याचा निर्णय घेतला.

IND VS WI – म्हणून रोहित आणि धवन संघात नाही, विराटने केला खुलासा

बीसीसीआयच्या नव्या नियमांनानुसार मैदानाच्या क्षमतेपैकी 90 टक्के तिकीटं सर्वसामन्यांच्या विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. याचा अर्थ एमपीसीएकडे फक्त 10 टक्के तिकीट आपल्या जवळच्या लोकांना देण्याचा अधिकार आहे. इंदूरच्या होळकर मैदानाची क्षमता 27 हजार प्रेक्षकांची आहे. याचा अर्थ एमपीसीएकडे फक्त 2 हजार 700 तिकीटं देण्याचा अधिकार होता.

याबाबत बोलताना एमपीसीएचे संयुक्त सचिव मिलिंद कनमडीकर म्हणाले की, आम्हाला आमचे सदस्य, तसेच विविध सरकारी एजन्सींच्या तिकीटाच्या मागण्याही पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे आम्ही बीसीसीआयकडे सामना इंदूरच्या होळकर मैदानात होणार असेल तर अधिक तिकीट देण्याची मागणी केली. परंतु बीसीसीआयने कनमडीकर यांची मागणी म्हणजे ब्लॅकमले करण्याची रणनिती असल्याचे सांगत सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.