हिंदुस्थानात अन्नाची प्रचंड नासाडी! संयुक्त राष्ट्राचा धक्कादायक अहवाल

जगभरात एकीकडे उपासमारी आणि पुपोषणासारख्या समस्या असताना दुसरीकडे मोठय़ा प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘फूड इंडेक्स 2021’ या अहवालानुसार, 2019 या वर्षात जगभरात तब्बल 93 कोटी 10 लाख टन अन्न वाया गेले आहे. हिंदुस्थानात दरवर्षी 687 लाख टन अन्न वाया जात असून दरवर्षाला प्रत्येक व्यक्ती साधारण 50 किलो अन्न वाया घालवते, असे या अहवालात म्हटले आहे.

‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे, अन्न वाया घालवायचे नाही’ असे आपल्याकडे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र विरोधाभास पाहायला मिळतो. घर, हॉटेल-रेस्टॉरंट, लग्नसमारंभ अशा विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे दिसते. 2019 साली जगभरात 69 कोटी लोकांची उपासमार झाली असून 3 अब्ज लोक असे होते ज्यांना पौष्टिक आहार मिळाला नाही. कोरोनामुळे या आकडेवारीत आणखी भर पडल्याची चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगभरात लोकांची उपासमार होत असताना मोठय़ा प्रमाणावर होणाऱया अन्नाच्या नासाडीबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली असून अन्न वाया न घालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जगभरातील आकडेवारी पाहिली तर प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी 74 किलो अन्नाची नासाडी होते. अफगाणिस्तानात एका व्यक्तीमागे सर्वाधिक म्हणजे 82 किलो अन्न वाया जाते. त्यापाठोपाठ नेपाळमध्ये प्रत्येक व्यक्तीमागे 79 किलो, श्रीलंकेत 76 किलो, पाकिस्तानात 74 किलो अन्न वाया जाते.

2019 मध्ये अन्नाची सर्वाधिक म्हणजे 61 टक्के नासाडी घरांमधून झाली आहे. हॉटेल-रेस्टॉरंटसारख्या फूड सर्व्हिसमधून 26 टक्के तर रिटेल क्षेत्रातून 13 टक्के अन्न वाया गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या