२०२५ पर्यंत हिंदुस्थान देणार चीनला धोबीपछाड- हार्वर्ड अहवाल

19

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार हिंदुस्थान २०२५ पर्यंत ७.७ टक्क्यांचा प्रतिवर्ष आर्थिक वृद्धिदर मिळवत चीनच्या अर्थव्यवस्थेला धोबीपछाड देईल. या विद्यापीठाच्या सेंटर ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाने अर्थव्यवस्थेच्या विकासानुसार हिंदुस्थानी अर्थव्यवस्था सर्वात अग्रेसर असल्याचं जाहीर केलं आहे.

या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांतील वैश्विक वृद्धीच्या बाबतीत हिंदुस्थान प्रगतीपथावर आहे. ज्यामुळे जागतिक आर्थिक विकासात चीनला मागे टाकत हिंदुस्थान पुढे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानने निर्यात क्षेत्रांमध्ये वाढ करताना रसायन, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स अशा नवीन क्षेत्रांना प्राधान्य दिलं आहे.

या अहवालाने चीनला विकसित देशांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. त्यामुळे चीनची आर्थिक प्रगती ही तुलनेने कमी राहून २०२५ पर्यंत हा दर निव्वळ ४.४१ टक्के इतकाच राहील. मात्र, हिंदुस्थान वेगवान आर्थिक प्रगती करत जगातली एक आर्थिक महासत्ता बनू शकेल, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या