येत्या काळात हिंदुस्थान जगाचे शिक्षण केंद्र बनेल!

36

सामना प्रतिनिधी । लातूर

जगात सध्या नावलौकिक असलेल्या पाश्चिमात्य देशातील विद्यापिठाअगोदर शिक्षण क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव मोठे होते. इथल्या नालंदा, तक्षशिला, अवंतीका, कांची, पैठण आदी शिक्षण संस्थाची ओळख त्यावेळी जगभरात होती. मात्र सततच्या परकीय आक्रमणामुळे ही शिक्षण केंद्रे नामशेष झाली. कालपरत्वे देशाची परस्थिती बदललेली असून शिक्षण क्षेत्रात हिंदुस्थानने पूर्वीचे स्थान गाठलेले असून येत्या काळात हिंदुस्थान जगाच्या शिक्षणाचे केंद्र बनेल असे प्रतिपादन पुणे येथील चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी येथे केले.

येथील विश्वशांती गुरुकुलच्या वतीने एमआयटी येथे ‘आजची भारतीय शिक्षण पद्धती, पालक, शिक्षक आणि तरुणांपुढील आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्राचार्या के. पी. शशीकला, डॉ. बी. एस. नागोबा, तुळशिराम दा. कराड, व्यवस्थापक प्रेम मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, विज्ञाला अधुनिकतेची जोड देवून मुल्याधिष्ठीत शिक्षणाव्दारे देशाची वाटचाल होणे गरजेचे असून भारताला शिक्षणातील अभिमानाचा वारसा पचवून पुढे जायचे आहे. शिक्षण म्हणजे स्वत:ची ओळख अर्थात आत्मज्ञान होय. विद्यार्थ्याने निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावान होणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे आहे. ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी जो व्यक्ती जीवनातले ११ हजार तास देतो त्याला यश मिळते. मात्र त्या व्यक्तीला यासाठी दररोज १० ते १२ तास वेळ द्यावा लागेल. जीवनातील इतका काळ खर्ची घातल्यानंतर तो व्यक्ती निवडलेल्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून समोर येईल.

सध्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत व वर्तनाबद्दल पालकांकडून तक्रारी येतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आई-वडील या भूमिकेतून निरपेक्षपणे ज्ञानदान करणे गरजेचे आहे. जेणेकरून गुरु-शिष्यातील नाते घट्ट होवून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल. इंग्रजी भाषेची ओळख ही विज्ञानाची भाषा म्हणून होती, मात्र कालओघात इंग्राजीवर मात करुन चिन देशाने स्वताच्या मातृभाषेत विज्ञानासह सर्व शिक्षण पद्धती विकसीत केली असून काही काळानंतर चिनी भाषा ही जगाची भाषा बनेल. त्यामुळे आपण इंग्रजी भाषेची गुलामी न बाळगता मातृभाषेबरोबरच आपल्याला इंग्रजीही उत्तम आले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत.

भाषा ही शब्द न शिकवता संस्कृती शिकवत असते. त्यामुळे मुलांना लहान वयात मातृभाषेत शिक्षण दिल्यास मेंदूची अधिक प्रगती होते. तसेच दोन भाषेत शिक्षण घेतल्यास मेंदूची प्रगती वाढते. त्यासाठी मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी या दोन भाषेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. मेंदूशास्त्रानुसान प्रत्येक माणुस हा बुद्धीवान असून प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळया क्षेत्रात चालते. हुशारी ही जन्मजातच असते असे नाही, प्रत्नातुनही हुशारी प्राप्त करता येते. प्रत्येक माणुस कोणत्याही एकाच क्षेत्रात प्रगती करु शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वताला ओळखून आपल्या आवडीचे व बुद्धीमत्तेला झेपेल अशाच क्षेत्राची करीअर म्हणून निवड करावी असेही त्यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या