फिट्टमफाट! टीम इंडियाचा ७५ धावांनी सनसनाटी विजय

सामना ऑनलाईन, बंगळुरू –

सलामीवीर लोकेश राहुलने दोन्ही डावांमध्ये झळकावलेले अर्धशतक… चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावांमध्ये केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी… अन् रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात तसेच रवीचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही डावांमध्ये अर्धशतक साजरे करणाऱ्या लोकेश राहुलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

या आकडेवारीवर एक नजर

  • रवीचंद्रन अश्विनने अवघ्या ४७ सामन्यांमध्ये एका डावामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी २५व्यांदा गारद करण्याची करामत करून दाखवली. याआधी रिचर्ड हॅडलीने ६२, तर मुथय्या मुरलीधरनने ६३ सामन्यांमध्ये ही किमया साध्य केली होती.
  • रवीचंद्रन अश्विनने बिशनसिंग बेदी यांच्या २६६ बळींना लीलया मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने मायदेशात २०० बळींचा टप्पाही पूर्ण केलाय.
  • चेतेश्वर पुजारा या कसोटीतील दुसऱ्या डावात ९२ धावांवर बाद झाला. यावेळी पहिल्यांदाच तो नर्व्हस नाइण्टीजचा शिकार बनला.

बंगळुरूतील गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर एक-एक धाव अत्यंत मोलाची असताना चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या जोडीने पाचव्या विकेटसाठी ११८ धावांची दमदार भागीदारी करीत सामन्याला कलाटणी दिली. अजिंक्य रहाणेने ५२ धावांची, तर चेतेश्वर पुजाराने ९२ धावांची खेळी साकारली. मुंबईकर अजिंक्य रहाणेने आपल्या खेळीत चार चौकार चोपून काढले, तर चेतेश्वर पुजाराने सात चौकारांची आतषबाजी केली. हिंदुस्थानचा संघ ४ बाद २३८ अशा सुस्थितीत असताना मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी प्रभावी कामगिरी करीत ऑस्ट्रेलियासाठी झोकात पुनरागमन केले. जोश हेझलवूडने ६७ धावा देत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हिंदुस्थानकडून मिळालेल्या १८८ धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११२ धावांमध्येच गडगडला. रवीचंद्रन अश्विनने ४१ धावा देत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उमेश यादवने दोन, इशांत शर्मा व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कर्णधार स्टीवन स्मिथने २८ धावा तसेच पीटर हॅण्डस्कोम्बने २४ धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या