दुसऱ्या वन डेत हिंदुस्थानचा विंडीजवर 53 धावांनी विजय; पूनम राऊतचे अर्धशतक

366

मुंबईकर पूनम राऊतची 77 धावांची शानदार अर्धशतकी खेळी आणि कर्णधार मिताली राजच्या 40 धावांच्या झुंजार खेळीच्या बळावर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वन डे लढतीत वेस्ट इंडिजला 53 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे पाहुण्या संघाने वन डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिला अटीतटीचा सामना यजमान विंडीज संघाने 1 धावेने जिंकला होता.

तीन एकदिवसीय लढतींच्या मालिकेत पहिला सामना गमावणाऱ्या हिंदुस्थानी महिला संघाने दुसऱ्या लढतीत मात्र शानदार पुनरागमन केले. नाणेफेक जिंकून हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत 50 षटकांत 6 बाद 191 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हिंदुस्थानी डावाची सुरुवात तशी अडखळतीच झाली. फक्त 17 धावांच्या मोबदल्यात हिंदुस्थानला प्रिया पुनिया (5) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (0) या आपल्या सलामीच्या फलंदाजांच्या विकेटस् गमवाव्या लागल्या. मात्र त्यानंतर पूनम राऊत (128 चेंडूंत 77) आणि कर्णधार मिताली राज (40) या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी साकारली. हरमनप्रीतनेही 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. हरमन आणि पूनम जोडीने चौथ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी साकारली. या तिघींच्या आक्रमक खेळामुळेच हिंदुस्थानला 6 बाद 191 धावांचा पल्ला गाठता आला. त्यानंतर यजमान विंडीज महिला संघाला 47.2 षटकांत सर्व बाद 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे पाहुण्या हिंदुस्थानी महिलांनी ही लढत 53 धावांनी जिंकत 3 लढतींच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या लढतीत झुंझार अर्धशतकी खेळी करणाऱ्या पूनम राऊतलाप्लेअर ऑफ मॅचपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विंडीजच्या वतीने शेमेन कॅम्पबेल (39) हिची झुंज एकाकी ठरली.

संक्षिप्त धावसंख्या 

हिंदुस्थान : 50 षटकांत 6 बाद 191  

वेस्ट इंडिज : 47.2 षटकांत सर्व बाद 138

 

आपली प्रतिक्रिया द्या