आज क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असून क्रिकेटचा डबल धमाका पहायला मिळणार आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषकामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानशी, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पुरुषांचा संघ बांगलादेशशी भिडणार आहे. महिलांचा सामना दुपारी, तर पुरुषांचा सामना सायंकाळी रंगणार आहे.
महिला टी-20 विश्वचषकामध्ये हिंदुस्थानी संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंडने हिंदुस्थानचा दारुण पराभव केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही पातळीवर न्यूझीलंडचा संघ सरस ठरला. या पराभवामुळे उपांत्यफेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला असून हिंदुस्थानी संघाला सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. एक पराभवही हिंदुस्थानला महागात पडू शकतो. हिंदुस्थानचा सामना आज पाकिस्तानशी होणार असून त्यानंतर आशियाई चॅम्पियन श्रीलंका आणि जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत.
दुसरीकडे कसोटी मालिकेत पाहुण्या संघाला व्हाईटवॉश दिल्यानंतर दोन्ही संघात आजपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ग्वाल्हेरमध्ये महिला सामना रंगणार आहे. या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यात मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा हे पदार्पण करण्याची शक्यता आहे.
मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला
ग्वाल्हेरमध्ये विरोध!
हिंदुस्थान आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका निर्विघ्नपणे पार पडली. मात्र, उभय संघांमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर भीतीचे सावट आहे. कारण ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी ‘ग्वाल्हेर बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, स्टेडियम परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. हॉटेलवरच नमाज अदा ग्वाल्हेरमध्ये हिंदुस्थानसोबतच्या टी-20 सामन्यापूर्वी बांगलादेशी क्रिकेटपटू शहरातील मोती मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी गेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी आपल्या हॉटेलमध्येच नमाज अदा केली. या पाश्र्वभूमीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही मोती मशिदीभोवती कडक बंदोबस्त ठेवला होता; परंतु बांगलादेशचा संघ आला नाही. अनेक मीडिया कर्मचारीदेखील पाहुण्या संघाची मशिदीजवळ वाट पाहत होते. बांगलादेशी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला, तेथून शहरातील फुलबाग परिसरातील मशीद तीन कि.मी. अंतरावर आहे. मशिदीत नमाज अदा न करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या पातळीवर घेतला गेला असावा. मात्र, सामन्यासाठी 4000 हून अधिक पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले आहेत.