हिंदुस्थानचा श्रीलंकेवर ८ विकेटने दणदणीत विजय

11

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

विशाखापट्टणम येथे झालेल्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानने लंकेचा ८ विकेटने पराभव केला करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. दिनेश कार्तिकने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानचा हा सलग आठवा मालिका विजय आहे. हिंदुस्थानचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद शतक, तर श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले.

लंकेने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना मोहालीतील हिरो कर्णधार रोहित शर्मा फक्त ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यात शतकी भागिदारी झाली. या दरम्यान श्रेयस अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर परेराने लकमलकरवी त्याल ६५ धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर धवनने दिनेश कार्तिकला सोबत घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. शिखर धवनने ८५ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबात १०० धावा केल्या. धवननचे एकदिवसी क्रिकेटमधील हे १२वे शतक आहेत. दिनेश कार्तिकने नाबाद २६ धावा केल्या. लंकेकडून परेरा आणि धनंजयाने प्रत्येकी एक बळी घेतला.

…तर पांड्याच्या नावावर जमा झाला असता ‘नकोसा’ विक्रम

त्याआधी नाणेफेक जिंकत हिंदुस्थानने लंकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. लंकेची सुरुवात चांगली झाली नाही. बुमराहने गुणतिलकाला १२ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. फक्त १५ धावांवर पहिला गडी बाद झाल्याने दबावात आलेल्या लंकेचा डाव थरंगा आणि समरविक्रमाने सांभाळला. दोघांमध्ये १०० पेक्षा जास्त धावांचा भागिदारी झाली. यादरम्यान अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या समरविक्रमाला चहलने ४२ धावांवर बाद केले. त्यानंतर मोहाली सामन्यातील शतकवीर मॅथ्यूजही १७ धावा काढून चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.

समोरील फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना थरंगाने एका बाजूने दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले. थरंगाने पांड्याच्या एकाच षटकात सगल ५ चौकार ठोकत जोरदार फलंदाजी केली. मात्र शतकापासून ५ धावा दूर असताना तो बाद झाला. कुलदिप यादवने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. एकवेळ लंकेची स्थिती २ बाद १६० अशी होती. मात्र थरंगा बाद झाल्यानंतर लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. हिंदुस्थानकडून युजवेंद्र चहल आणि कुलदिप यादवने प्रत्येकी ३ बळी घेतले, तर हार्दिक पांड्याने २ आणि बुमराह व भुवीने प्रत्येकी एक बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या