रोहितची ‘अजिंक्य’ खेळी, हिंदुस्थानची अव्वल स्थानावर झेप

37

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरच्या व्हीसीए मैदानावर झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २४३ धावांचे आव्हान हिंदुस्थानने अजिक्य रहाणे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा बळी गमावत पूर्ण केले. अंतिम सामन्यात विजयासह हिंदुस्थानने पाच एकदवसीय सामन्याची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली आहे. पाचव्या सामन्यातील विजयामुळे हिंदुस्थानने पुन्हा एकदा आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सलग तिसऱ्या सामन्यात शतकी सलामी दिली. या दरम्यान अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने आपली अर्धशतकंही पूर्ण केली. २३व्या षटकात नॅथन कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर रहाणे पायचित झाला. रहाणेने ७ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि शर्मामध्ये ९९ धावांची भागिदारी झाली. रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी रोहितने १०९ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह १२५ धावांची मॅचविनिंग खेळी केली.

रोहितनंतर कोहलीही लगेचच बाद झाला. त्याने ३९ धावा केल्या. कोहली बाद झाला तेव्हा हिंदुस्थानला विजयासाठी फक्त १६ धावांची आवश्यकता होती. केदार जाधवने नाबाद ५ आणि मनिष पांडेने नाबाद ११ धावा करत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने २ आणि नॅथन कुल्टर-नाईल १ बळी घेतला.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावसंख्या उभारली होती. डेव्हिड वॉर्नर आणि फिंचने अर्धशतकीय सलामी दिली. आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या फिंचला बाद करत पांड्याने हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. फिंचने ३२ धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त हेडने ४२ आणि स्टॉनिसने ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाणामारीच्या प्रयत्नामध्ये एका मागोमाग एक बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. हिंदुस्थानकडून फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ३, बुमराहने २, तर पांड्या, भुवनेश्वर आणि जाधवने प्रत्येकी एक बळी घेतला.

मालिकावीराचा किताब अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला देण्यात आला.

तिन्ही प्रकारात अव्वल स्थानाची संधी

हिंदुस्थानकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावण्याची संधी असणार आहे. कसोटीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव केल्याने एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यास मर्यादित षटकांच्या प्रकारातही हिंदुस्थान अव्वल स्थानावर येण्याचा पराक्रम करेल. त्यामुळे एकाच वेळी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानावर येण्याचे विराट चॅलेंज हिंदुस्थासमोर आहे. टी-२० मालिकेला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका

पहिला सामना – ७ ऑक्टोबर (रांची)
दुसरा सामना – १० ऑक्टोबर (गुवाहाटी)
तिसरा सामना – १३ ऑक्टोबर (हैद्राबाद)

आपली प्रतिक्रिया द्या