अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या लोकांचा दबदबा वाढतोय, बायडेन यांचा कौतुकाचा वर्षाव

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनामध्ये हिंदुस्थानी वंशांचे अनेक अधिकारी आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून 50 दिवसांमध्ये बायडन यांनी प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर हिंदुस्थानी वंशाच्या जवळपास 55 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बायडन यांच्या भाषण लेखन ते अंतराळ संशोधन संस्था नासासह अनेक सरकारी विभागांमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. याबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या लोकांचा दबदबा वाढतोय, असे म्हणत हिंदुस्थानी वंशाच्या लोकांच्या हुशारीचे कौतुक केले.

गुरुवारी मंगळ ग्रहावर ‘पर्सिक्हियरन्स’ हे रोव्हर उतरवण्याच्या अभियानात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांशी बोलताना जो बायडन यांनी हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांचे कौतुक केले. ते म्हणाले, हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांचा अमेरिकेत दबदबा वाढला आहे. यावेळी त्यांनी नासाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन, उपराष्ट्रपती कमला हॅरीस, भाषण लेखक विनय रेड्डी यांच्या नावाचाही उल्लेख केला.

अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे पर्सिक्हियरन्स रोव्हर यान मंगळावर नुकतंच यशस्वीपणे उतरले. रोव्हर आता मंगळावरील जीवसृष्टीचे अस्तित्व शोधणार आहे. नासाच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेत हिंदुस्थानी वंशाची महिला शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांची भूमिका महत्त्वाची ठरली. स्वाती यांनी रोव्हरच्या नियंत्रण आणि लँडिंग सिस्टीमचे नेतृत्व केले. सर्वात कठीण अशा टचडाऊन नेव्हीगेशनचे काम त्यांनी सांभाळले.

गर्वाचा क्षण

बायडन प्रशासनामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या 55 अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. यातील अर्ध्याहून अधिक महिला असून त्या व्हाईट हाऊसमध्ये काम करत आहेत. याआधी बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही हिंदुस्थानी वंशाच्या अनेक अधिकाऱ्यांची प्रशासनामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत बोलताना हिंदुस्थानी वंशाचे समाजसेवक आणि ‘इंडियास्पोरा’चे संस्थापक एम. रंगास्वानी यांनी हा गर्वाचा क्षण असल्याचे म्हटले. आपल्या समुदायाच्या लोकांची प्रगती पाहणे अत्यंत सुखद असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या