
कॅनडामधून बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सेंट लॉरेन्स नदीत बुडून सर्वांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
‘सीबीसी’ आणि ‘सीटीव्ही’ या कॅनडातील प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. गुरुवारी कॅनडाच्या तटरक्षकल दलाला सेंट लॉरेन्स नदीमध्ये एक बोट पलटी झाल्याचे दिसून आले. यानंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान आठ मृतदेह हाती लागले. याबाबत पोलिसांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून प्राथमिक तपासात हे मृतदेह दोन वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याचे सांगितले. यातील एक कुटुंब मूळचे रोमानिया तर दुसरे हिंदुस्थानचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅनडामधून अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करताना त्यांच्या बोटीला खराब हवामानामुळे अपघात झाला असावा आणि नदीमध्ये बुडून सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृतांमध्ये दोन लहान मुलांसह सहा प्रौढांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
6 जणांना वाचवले
दरम्यान, कॅनडातून अमेरिकेमध्ये घुसखोरी करताना मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात सहा हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकन सीमेजवळ सेंट रेजिस नदीमध्ये बुडताना वाचवण्यात आले होते. त्याआधी जानेवारीमध्ये अमेरिकन सीमेजवळ मॅनिटोबा येथे 4 हिंदुस्थानी नागरिकांचे मृतदेह बर्फात आढळले होते. हे सर्व गुजरातच्या डिंगुचा येथील रहिवासी होते. त्याआधी सात हिंदुस्थानी नागरिकांनाही घुसखोरी करताना पकडण्यात आले होते.