कश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश; 10 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक

हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी कश्मीरच्या पूंछमध्ये मोठी कारवाई केली आहे. हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात लष्कराला यश आले आहे. त्यांच्याकडून एका प्रेशर कुकरमध्ये जिंवत बॉम्बही सापडला आहे. सुमारे 10 किलो आयईडीच्या मदतीने हिंदुस्थानी लष्कराच्या तुकड्यांना लक्ष्य करण्याचा आणि घातपाताचा त्यांचा डाव होता. लष्कराने दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला आहे.

तांदुळ शिजवण्याच्या प्रेशर कुकरमध्ये 10 किलो आयईडीने पाकव्याप्त कश्मीरमध्ये बॉम्ब तयार करण्यात आला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी स्थानिक असून ते एलओसी पार करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, ड्रग्ज आणि आयईडी बॉम्ब घेऊन परतत होते. हिंदुस्थानी हद्दीत ते घुसखोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर हिंदुस्थानी लष्कराने सतर्कता दाखवत रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे लष्कराच्या जवानांनी त्यांना इशारा देत थांबण्यास सांगितले. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारातून हिंदुस्थानी जवान थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत तीन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, आयईडी बॉम्ब आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या बॉम्बचा वापर लष्कराच्या जवानांच्या ताफ्यावर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराच्या जवानांनी घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे.