चिनी सैन्याला रोखणार हिंदुस्थानी उंट

सामना ऑनलाईन । लडाख

सिक्कीम-भूतान-तिबेट सीमेजवळील क्षेत्राच्या वर्चस्वासाठी चीनने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. चीनच्या या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी तसेच स्वतःचे आणि शेजारच्या भूतान, नेपाळचे चिनी आक्रमकतेपासून रक्षण करण्यासाठी हिंदुस्थान सरसावला आहे. सावध झालेल्या हिंदुस्थानने चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उंटांचा वापर करण्याची योजना आखली आहे. सैन्याच्या एका प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पांतर्गत एक आणि दोन बाक (कुबड) असलेल्या उंटांचा वापर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल – एलएसी) केला जाणार आहे.

उंटांना गस्त घालण्यासाठी तसेच दारुगोळा आणि अन्य सामानाची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. दोन कुबड असलेले बॅक्ट्रियन जातीचे उंट १८० ते २२० किलोपर्यंत वजनाचे सामान वाहून नेऊ शकतात. हिंदुस्थान सैन्यासाठी लागणारे बरेचसे सामान गाढवांच्या अथवा खेचरांच्या पाठीवर लादून एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतो. मात्र गाढवांची तसेच खेचरांची वजन वाहून नेण्याची क्षमता ४० किलोंच्या आसपास आहे. खेचरांच्या तुलनेत दोन कुबड असलेले उंट अधिक वेगात चालतात आणि सपाट जमिनीवर दोन तासात १० ते १५ कि.मी. चे अंतर पार करू शकतात.

हिंदुस्थानात दोन कुबडांचे उंट केवळ लडाखच्या नुब्रा खोऱ्यात आढळतात. सैन्याला बिकानेरच्या राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रातून चार उंट मिळाले आहेत. सैन्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास एक आणि दोन कुबडाच्या उंटांचा वापर १२ ते १५ हजार फूट उंच क्षेत्रात केला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या