सीमाभागातून तातडीने सैन्य मागे घ्या; लष्करी चर्चेत हिंदुस्थानचा चीनला इशारा

5599

हिंदुस्थान आणि चीनदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या पूर्व सीमाभागावरून आणि पेगाँग सरोवराच्या भागातील सीमेवरून तणावाचे वातावरण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरु आहे. रविवारी या चर्चेची पाचवी फेरी झाली. या चर्चेत वादग्रस्त सीमाभागातून चीनने आपले सैन्य तातडीने मागे घ्यावे, असा इशारा हिंदुस्थानने दिला आहे. ही चर्चा सुमारे 11 तास सुरू होती. या चर्चेत चीनने सैन्य मागे घेण्यावर हिंदुस्थानकडून जोर देण्यात आला. एलएसीजवळ मोल्डोमध्ये सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक रात्री 11 वाजता संपली.

चीनने लडाखमध्ये अण्वस्त्रवाहू विमाने तैनात केली आहेत. तसेच याआधीच्या लष्करी चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनने सैन्यही मागे घेतलेले नाही. त्यामुळे सीमाभागात चीनकडून तणाव वाढवण्यात येत आहे. त्यामुळे चीनच्या कोणत्याही कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराचे जवान सज्ज आहेत. चीनने सैन्य मागे घेतले नाही, तर आपल्याला त्यांचा सामना करावाच लागेल, असे संकेत रविवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीपूर्वी दिले आहेत. तसेच रविवारी झालेल्या लष्करी चर्चेत चीनने सैन्य मागे घेण्याचा इशारा हिंदुस्थानकडून देण्यात आला आहे. लडाख सीमाभाग आणि पेगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेत 5 मे पूर्वीची स्थिती बनवण्यावर हिंदुस्थानने जोर दिला आहे. या बैठकीला हिंदुस्थानी शिष्टमंडळाचे नेतृत्व लेहस्थित 14 कोरचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंह यांनी तर चीनचे नेतृत्व शिनजियांगचे कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी केले. याआधी 14 जुलैला झालेली चर्चा 15 तास सुरू होती. त्यावेळी सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.

गलवान खोऱ्यात हिंदुस्थान आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. सीमाभागातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असताना दोन्ही देशातील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनच्या 42 सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात लष्करी चर्चा झाली. त्यात दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवल्यानंतरही चीनने सैन्य मागे घेतलेले नाही. काही भागातून सैन्य मागे घेण्यात आले आहे. मात्र पेगाँग सरोवराजवळील फिंगर 4 ते फिंगर 8 या भागातून चीन सैनिक मागे हटलेले नाहीत. त्यामुळे चीनने तातडीने सैन्य मागे घेण्याचा इशारा हिंदुस्थानने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या