जागतिक बॉक्सिंगमध्ये ‘सोनियाचा दिन’, नीतू, स्वीटी बुरा जगज्जेती

हिंदुस्थानी बॉक्सिंगसाठी आजचा दिवस सोनियाचा ठरला. आधी नितू घंघासने 48 किलो वजनी गटात सोनेरी यश मिळवत जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत जगज्जेतेपद संपादले होते, तर स्वीटी बुराने 81 किलो वजनी गटात चीनच्या वँग लिनाचा 4-3 ने पराभव करीत सुवर्ण जिंकत जगज्जेतीपदाला गवसणी घातली.

राजधानी सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हरयाणाच्या 22 वर्षीय नितू घंघासने किताबी लढतीत लुत्सेखान अल्तान्सेटसेग हिला 5-0 गुणफरकाने लोळवीत हे सुवर्ण यश संपादन केले. नितूपाठोपाठ स्वीटी जगज्जेती होणारी हिंदुस्थानची (महिला व पुरुष) सातवी बॉक्सर ठरली. याआधी एम. सी. मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010, 2018), लेखा केसी (2006) व निकहत झरीन (2022) या हिंदुस्थानी महिला बॉक्सर्सनी जगज्जेतेपद पटकावले आहे. नितू आणि स्वीटीच्या जगज्जेतेपदामुळे जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानकडे आता 12 सुवर्णपदके झाली आहेत. यात मेरी कोम हिने सर्वाधिक सहा सुवर्णपदके जिंकली आहेत.