मैफल

सावनी शेंडे

आल्हाददायक गुलाबी थंडी…मनाला मोहवणारी गाण्यांची मैफल…नेहमीच रसिक प्रेक्षकांना धुंद करते. हिवाळ्यात बऱयाच ठिकाणी गाण्यांच्या मैफलींचे आयोजन केले जाते. वातावरणातील थंडीचा आस्वाद घेत रसिक या मैफिलींना उपस्थित राहतात. गार वाऱयातील थंडीत लुटलेली मैफलींची मजाही काही औरच असते, मात्र गायकाकरिता या मैफली म्हणजे एक आव्हान असतं.

निसर्ग आणि संगीत

निसर्गातून पहिला ध्वनी आपल्याला मिळाला या ध्वनीचं पुढे संगीतात रूपांतर झालं. म्हणून निसर्ग आणि संगीत यांचा घनिष्ठ संबंध आहे. निसर्गाची विविध बदलती रूपे जशी आपण सतत अनुभवत असतो त्याप्रमाणे संगीतातल्या रागांचीही रूपे बदलत असतात. विविध ऋतुंत होणाऱया कोजागिरी, दिवाळी पहाटसारख्या मैफलींतून प्रेक्षकांना ती अनुभवायला मिळतात. उदा. यमन किंवा भैरव राग एवढे व्यापक आहेत की, त्यांची प्रत्येक वेळेला वेगवेगळी रूपं अनुभवायला मिळतात.

निसर्ग आणि राग

थंडीतल्या मैफलींची एक आगळीवेगळी मजा असते. त्यामुळे लोक जरी शाली गुरफटून मैफलीला आली असली तरी मैफलीत रंग भरण्याचं गायकाला एक आव्हान असतं. विशेषत: दिवाळी पहाटसारख्या मैफली किंवा दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीतल्या मैफली असतील तर गायकाला गाण्याची हलकी सुरुवात करणे गरजेचं असतं. यामुळे थंडीतला एक वेगळाच माहोल मैफलीत तयार होतो. हिवाळ्यात हेमंत ऋतू असतो. या ऋतूवर आधारित हेमंत राग आहे. या रागामध्ये हेमंत ऋतूचं वर्णन आहे. थंडीचं वर्णन असणाऱया अनेक बंदिशी या रागात लिहिलेल्या आहेत.

थंडीतल्या संगीताचा प्रेक्षकांवर सकारात्मक परिणाम

उन्हाळ्यात त्रासून प्रवास करून, पावसाळ्यात ट्रफिक जॅम किंवा भिजून एखाद्या संगीत कार्यक्रमाला जाण्यापेक्षा थंडीत लोकांची मानसिकता खूप छान असते. अशा छान वातावरणात तारे, चंद्र, प्रियकर, प्रेयसी यांचा संदर्भ असलेली गाणी, बंदिश किंवा राग प्रेक्षकांना अधिक भावतात. कधी कधी कार्यक्रमाच्या ठिकाणी शेकोटय़ा पेटवलेल्या असतात. या शेकोटय़ांची ऊब घेत रसिक श्रोते मैफलीची रंगत लुटतात.
खाणं, गाणं, थंडी

कलाकाराला कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो, यावेळी विशिष्ट गोष्टीवर अडून राहण्याऐवजी आहे त्याचा स्वीकार करावा लागतो, विशेषत: थंडीत कितीही काळजी घेतली तरी सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवतात. म्हणून संगीतसाधना करणाऱया गायकाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

गायकासाठी कसोटी

गाण्यांचे महोत्सव आणि मैफलींचे आयोजन प्रामुख्याने थंडीच्या दिवसांत केले जाते. अशावेळी आवाज बसणे, गाताना त्रास होणे या समस्या उद्भवू शकतात, मात्र असे असूनही त्रास होतोय, हे प्रेक्षकांना जाणवू न देता गाणे ही गायकासाठी कसोटी असते.