मुलगा व सुनेकडून महिलेचा अनन्वित छळ, दोन्ही डोळ्यांची बुब्बुळ फोडली

सामना ऑनलाईन । दुबई

दुबईत राहणाऱ्या एका हिंदुस्थानी व्यक्तीवर व त्याच्या पत्नीवर त्याच्या आईचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निष्ठूर मुलाने त्याच्या आईचे डोळे फोडत तिच्या संपूर्ण शरिराला चटके दिले आहेत. पीडित महिलेची तिच्या मुलाच्या ताब्यातून सुटका केली तेव्हा तिचे वजन अवघे 29 किलो झाले होते.

आनंद (नाव बदलले आहे) हा गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीसोबत व मुलीसोबत दुबईत राहत होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आनंदची आई देखील त्याच्यासोबत दुबई येथे राहायला आली. मात्र आनंदला व त्याच्या पत्नीला ते आवडले नव्हते. त्यामुळे त्यांनी आईचा छळ करण्यास सुरुवात केली. ते तिला सात आठ दिवस उपाशी ठेवायचे. तिच्या संपूर्ण अंगाला त्यांनी चटके दिले होते. तिला मारहाणही केली जायची. सर्वात क्रूर प्रकार म्हणजे त्यांनी तिचे डोळे देखील फोडले होते.

काहि दिवसांपूर्वी पीडित महिला घराच्या गॅलरी नग्नावस्थेत पडलेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तिला बघितले व त्या विषयी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्या महिलेला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना देखील ती वेदनेने प्रचंड किंचाळत होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या मुलाला व सुनेला ताब्यात घेतले आहे.