हिंदुस्थानला क्रिकेट ‘महासत्ता’ बनविण्याच्या दिशेने पाऊल, BCCI ची 500 कोटींची योजना

1034

हिंदुस्थानला क्रिकेट महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक आश्वासक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जगभरातील चॅम्पियन संघांना टक्कर देणारा हिंदुस्थानी संघ घडवण्याचे उद्दिष्ट बोर्डाने डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यानुसार 4 वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संकुलात तयार करण्यात येणार आहेत. सेन्टर ऑफ एक्सलन्स (सीओई) म्हणून ओळखल्या जाणारे केंद्र उभारण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च होतील असा बीसीसीआयचा अंदाज आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 1 ते 2 वर्षे लागतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सीओई प्रकल्प सिद्ध करण्याचा आराखडा तयार करण्यात येत असून एनसीएचे प्रमुख आणि माजी हिंदुस्थानी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. जगातील सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा बहुमूल्य अनुभव हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना मिळावा हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

cricket-acadmy

क्रिकेट मैदानातील विविधता अनुभवता येणार
एनसीएमध्ये साकारल्या जाणाऱ्या सीओई प्रकल्पात 4 वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या मातीचा आणि गवताचा वापर केला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव या केंद्रामुळे टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटूंना लाभणार आहे. देशांतर्गत स्पर्धांव्यतिरिक्त या खेळपट्ट्यांचा वापर अन्य स्पर्धांसाठीही करता येणार आहे. पाहुण्या संघांच्या सर्व लढती, बोर्डाच्या सर्व लढतींसाठीही या खेळपट्ट्या वापरता येतील असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

हायटेक आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्राचाही होणार वापर
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सेन्टर ऑफ एक्सलन्समध्ये रोबो गोलंदाजी प्रशिक्षक, ऍथलिट मॉनिटरिंग यंत्रांचाही क्रिकेटपटूंचा फिटनेस व स्टॅमिना वाढविण्यासाठी वापर करण्याची बोर्डाची महत्वाकांक्षी योजना आहे. आता विविध कामांसाठी टेंडर काढली जातील आणि कमला सुरुवात होईल. या प्रकल्पाच्या ब्लु प्रिंटचा अभयास केला असता या हायटेक क्रिकेट प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांचा खरंच येईल असा अंदाज बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या