हिंदुस्थानी संघाची कसोटी! आयपीएल आणि जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये फक्त 18 दिवसांचाच फरक

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या बलाढय़ संघांना हरवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली. पण जगातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा जिंकणे विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी सोपे नसणार आहे. कारण आयपीएल व जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या दोन स्पर्धांमध्ये फक्त 18 दिवसांचाच फरक आहे.

आयपीएलचा अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून रोजी सुरू होणार आहे. हिंदुस्थानी संघाला 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे फायनलसाठी जेव्हा हिंदुस्थानी खेळाडू मैदानात उतरतील तेव्हा त्यांना पुरेसा सराव मिळालेला नसेल. यामुळे इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी व वातावरणात हिंदुस्थानच्या खेळाडूंची ‘कसोटी’ लागेल हे निश्चित.

…तर आशिया कपमध्ये टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ खेळणार

जून महिन्याच्या अखेरीस आशिया कपचे आयोजन करण्याचा विचार आयसीसीकडून करण्यात येत आहे. 2020 सालामध्ये ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता या स्पर्धेला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आल्यास टीम इंडियाच्या बेंचवर बसलेल्या खेळाडूंना यामध्ये खेळावे लागणार आहे.

कारण हिंदुस्थानचे प्रमुख खेळाडू जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंग्लंडमध्येच राहणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी ते सज्ज होणार आहेत. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा यांसारखे खेळाडू आशिया कपसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार नाहीत.

या खेळाडूंना मिळू शकते संधी

आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर, टी नटराजन यांचा समावेश असेल. तसेच लोकेश राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकते.

साऊथम्पटनवर सामना

हिंदुस्थान – न्यूझीलंड यांच्यामध्ये 18 जूनपासून सुरू होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्डस्ऐवजी साऊथम्पटनवर होणार आहे. बीसीसीआयकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली. साऊथम्पटनमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी अव्वल दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या