क्रिकेटपटूंना मिळणार पगारवाढ

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी हंगामात हिंदुस्थानच्या संघातील अव्वल दर्जाचे खेळाडू आणि देशांतर्गत खेळणारे क्रिकेटपटू यांचा पगार वाढणार आहे. क्रिकेटपटूंच्या पगारासाठी बीसीसीआय सध्या १८० कोटींची तरतूद करते. मात्र नव्या हंगामासाठी पगाराकरिता आणखी २०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनाच्या पटीत रणजी खेळाडूंच्या मानधनातही वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांची समिती लवकरच पगारासाठीच्या तरतुदीवर अंतिम निर्णय घेणार आहे.

संघातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंच्या पगाराचा प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी बीसीसीआयच्या पदाधिका-यांसमोर ठेवण्यात येणार आहे. अलिकडेच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतनवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या पगारासाठीच्या तरतुदींमध्ये भरघोस वाढ होणार असल्याचे वृत्त आहे. सध्या बीसीसीआय नफ्याच्या २६ टक्के रक्कम खेळाडूंच्या पगारासाठी खर्च करते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना १३ टक्के तर रणजी मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंना १० टक्के वाटा दिला जातो. उर्वरित ३ टक्के वाटा महिला आणि कनिष्ठ क्रिकेटपटू यांना मिळतो.

रणजी खेळाडूंना १२ ते १५ लाख रुपये मिळतात. राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंना शंभर टक्के वाढ मिळाली तर तितकीच वेतनवाढ रणजी क्रिकेटपटूंना मिळण्याची शक्यता आहे. नव्या प्रस्तावानुसार रणजी क्रिकेटपटूंना वर्षाला ३० लाख रुपये मानधन मिळू शकेल. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडूंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या