कमरेला ‘करदोडा’ का बांधला जातो?

गेल्या शतकात हिंदू धर्मातील मुले व पुरुषांच्या दृष्टीने आवश्यक असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे ‘करदोडा!’ त्या काळात हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पुरुषास करदोडा वापरणे अनिवार्य होते.

‘करदोडा’ म्हणजे कमरेभोवती बांधावयाचा दोरा किंवा गोफ. हा गोफ आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचा, रेशमाचा किंवा साधा दोरा बांधला जात असे. अनेकदा काळ्या रंगाचा रेशमी गोफ कमरेभोवती बांधला जात असे. यालाच ग्रामीण भाषेत ‘करदोडा’ किंवा ‘कडदोरा’ असे म्हणतात. कडदोऱ्याप्रमाणेच याला ‘कटदोरा’ किंवा ‘करगोटा’ असेही संबोधले जात असे. काही श्रीमंत मुले करदोडा म्हणून चांदीची बारीक साखळी कमरेला बांधत. पूर्वी हा करदोडा केवळ एक शोभेची वस्तू म्हणून वापरला जात नव्हता तर धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ प्रकट करणारे प्रतीक म्हणून वापरला जात होता.

या शब्दासाठी तीन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. ‘कटि’ या संस्कृत शब्दाला ‘दोरा’ हा प्राकृत देशी शब्द लागून ‘कटिदोरा’ शब्द तयार झाला व पुढे ‘कडदोरा’ बनला. हा दोरा कमरेवरच बांधला जात असल्याने ही व्युत्पत्ती ठीक वाटते. दुसरी व्युत्पत्ती अशी की संस्कृतातील ‘कटिग’ पासून ‘कडदोरा’ शब्द निर्माण झाला. तिसरी व्युत्पत्ती अशी की ‘कटिसूत्र’ शब्दापासून हा शब्द निर्माण झाला. संतश्रेष्ठ तुकोबांनी या शब्दाचा वापर केला आहे. “पायी घागरिया सरी। कडदोरा वाकी।। ” असा उल्लेख एका अभंगात केला आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सतीश राजगुरे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या