हिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला!

1042

हिंदुस्थानात चहाचा व्यवसाय करणारे काहीजण लखपती बनले आहेत. मात्र, परदेशात हिंदुस्थानी पद्धतीने बनवलेला आणि हिंदुस्थानातील विशेष चवीचा चहा विकून एक महिला करोडपती बनली आहे. अमेरिकेतील कोलोराडोतील ऐडी ब्रूक या महिलेने अमेरिकेत हिंदुस्थानी चवीचा चहाचा व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ती करोडपती बनली आहे. तिच्या चहाची चव प्रत्येकाच्या जीभेवर रेंगाळत असते. हिंदुस्थानी चहामुळे अल्पावधीतच करोडपती बनणाऱ्या ऐडीला ही कल्पना कशी सूचली याची माहिती रोचक आहे.

सुमारे 17 वर्षांपूर्वी ऐडी 2002 मध्ये हिंदुस्थानात आली होती. तेव्हा येथील चहाचा स्वाद त्यांना खूप आवडला होता. चार वर्षे हिंदुस्थानात राहिल्यानंतर 2006 मध्ये ऐडी अमेरिकेत परतली. अमेरिकेत गेल्यावर हिंदुस्थानी चवीच्या चहाचा स्वाद घेण्यासाठी ऐडी आतूर झाली होती. त्याचवेळी अमेरिकी नागरिकांना हिंदुस्थानी चवीचा चहा दिला तर त्यांना तो आवडेल, ही कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी हिंदुस्थानी चवीच्या चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये छोट्या प्रमाणात त्यांनी चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली. आपल्या चहाला त्यांनी ‘भक्ती चहा’ असे नाव दिले. अल्पावधीतच हा चहा अमेरिकेत लोकप्रिय झाला. सुरुवातीला छोट्या दुकानात त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. इतर कॅफे आणि रिटेलर्सद्वारे त्या चहाचा व्यवसाय वाढवत होत्या. लोकांच्या वाढत्या प्रतिसादाने त्यांचे छोटे दुकान मोठ्या व्यवसायात बदलून गेले. त्यांनी वर्षभरातच चहाची वेबसाइट लाँच केली. त्यांचा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांनी वर्षभरात सुमारे 200 कोटी रुपये कमवले आहेत. तसेच आता या व्यवसायात शेकडो लोक काम करत आहेत. एंटरप्रेन्योर मॅगझीनमध्ये 2014 मध्ये ब्रूक ऐडी यांना एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर अवॉर्डमध्ये पहिल्या पाचजणांमध्ये त्यांना स्थान मिळाले होते.

व्यवसाय वाढल्यानंतर ऐडी यांनी विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा बनवण्यास सुरुवात केली आहे. कार्यालये आणि घरांमध्ये या चहाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपण अमेरिकी असलो तरी हिंदुस्थानाशी आपले जवळचे नाते आहे, असे ऐडी सांगतात. प्रत्येकवेळी हिंदुस्थानात आल्यावर आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असे त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या