हिंदुस्थानी डॉक्टर परदेशात उपचार करणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काढले पत्रक

हिंदुस्थानात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले आता थेट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशात जाऊन उपचार (प्रॅक्टिस) करू शकणार आहेत. यासाठी जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (डब्ल्यूएफएमई) ने नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) ला परवानगी दिली आहे. हिंदुस्थानात दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी हा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

राष्ट्रीय मेडिकल कमिशनला दहा वर्षांसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच हिंदुस्थानातील सर्व 706 मेडिकल कॉलेजेसना जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (डब्ल्यूएफएमई) ची मान्यता मिळाली आहे. तसेच जी नवी मेडिकल कॉलेज देशात सुरू होतील त्यांना आपोआप याची मान्यता मिळणार आहे. पुढील दहा वर्षांसाठी याचा फायदा मिळू शकणार आहे. या नव्या निर्णयामुळे आता हिंदुस्थानात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर झालेले थेट अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशात प्रॅक्टिस करू शकतील; परंतु सरकारी धोरणानुसार देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन काही वर्षे सेवा देणे बंधनकारक आहे. याचे पुढे काय होईल, हे अजून स्पष्ट नाही.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

या निर्णयामुळे हिंदुस्थान मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना किंवा डॉक्टर्सना जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाचा स्तर उंचावण्यास मदत मिळणार आहे.