हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ढेपाळली, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केली चिंता

423

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढेपाळलीय. आजच्या घडीला तिची हालत इतकी वाईट झालीय की नजीकच्या काळात ती पुन्हा रुळावर येईल याचीही शाश्वती देता येणार नाही अशी चिंता अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी सोमवारी अमेरिकेतून दूरध्वनीवरून एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.

वर्ल्ड बँकेने हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत धोक्याची घंटा वाजवून दिवस उलटत नाही तोच बॅनर्जी यांनी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी हा अत्यंत काळजीचा विषय असल्याचे मत मांडले. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी अर्थव्यवस्थेची सध्याची बिकट स्थिती, जीडीपीला लागलेली उतरती कळा, सरकारची धोरणे यावर आपली मते व्यक्त केली. जीडीपीतील घसरण हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत आम्ही अर्थव्यवस्थेत तेजी पाहिली, मात्र आताची आकडेवारी पाहून सर्व आशा संपल्या आहेत. पुढच्या काही काळात ही ढेपाळलेली अर्थव्यवस्था पुन्हा डोके वर काढेल असे दिसत नाही, असा नाराजीचा सूर बॅनर्जी यांनी आळवला.

बांधकाम क्षेत्रातील संकटाने कामगारांचा घास हिरावला

बांधकाम क्षेत्रात राबण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर अकुशल कामगार ग्रामीण भागातून सहा महिन्यांसाठी शहरात येतात. इथे राबून कमावलेले पैसे गावी घेऊन जातात. बांधकाम क्षेत्रही संकटात रुतलेय. त्यामुळे या कामगारांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, असेही बॅनर्जी यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या