हिंदुस्थानींवर कर्जाचा बोजा वाढला; 5 वर्षात 58 टक्क्यांची वाढ

हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या घरगुती बचतीवर विपरीत परिणाम झाला आहे. पाच वर्षात हिंदुस्थानींवर कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कर्जाचा बोजा 58 टक्क्यांनी वाढून 7.4 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. वर्षभरापूर्वी ही वाढ 22 टक्क्यांची होती. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन विभागाने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे.

पाच वर्षात कुटुंबावरील कर्जात दुपटीने वाढ झाली आहे. तर खर्च होणाऱ्या वेतनात ( डिस्पोझिबर इन्कम) फक्त अडीच टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या एकूण बचतीत 4 टक्क्यांनी घट झाली आहे. 34.6 टक्क्यांवरून ही बचत 30.5 टक्क्यांवर आली आहे. घरगुती बचत घटल्याने देशातील बचतही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 2012 या आर्थिक वर्षात घरगुती बचत 23.6 टक्के होती. ती 2018 मध्ये 17.2 टक्के झाली आहे. पाच वर्षात यात सुमारे सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसत आहे.

आता कर्जाचे दर कमी करून ही घट भरून निघणार आहे. आता यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलण्याची गरज आहे, असे मत स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केले आहे. कॅपिटल गेन टॅक्स हटवल्यानंतर 2018 मध्ये वित्तीय बचतीवर काही परिणाम दिसला. मात्र, 2019 मध्ये या बचतीत पुन्हा घट झाली आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरजही या अहवालात नमूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेत लाभार्थ्यांचे उद्दीष्ट्य गाठण्यात आलेले नाही. ग्रामीण भागातील आर्थिक स्रोत आणि उत्पन्नाचे प्रमाण वाढल्यास त्यांची खर्च करण्याची आणि बचत करण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

पाच वर्षांच्या काळात खासगी गुतंवणुकीतही घट झाली आहे. 2007 ते 2014 या काळात या गुतंवणुकीचे प्रमाण 50 टक्के होते. ते आता 30 टक्क्यांवर आले आहे. या आकडेवारीवरून आर्थिक संकट किती बिकट आहे, हे दिसून येते. त्यामुळे आता सरकारकडून ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे बचतीचे प्रमाण किती वाढते आणि हिंदुस्थानींच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा किती प्रमाणात कमी होतो, याकडे अर्थक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या